आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या अंदाजपत्रकावर शनिवारी होणार चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका प्रशासनाने २०१७-२०१८ चे १८६ कोटी रुपयाचे अंदाज पत्रक महासभेकडे सादर केले आहे. या अंदाज पत्रकाला मंजुरी देण्यासाठी २९ एप्रिलला सकाळी ११ वाजता महासभा बोलावण्यात आली आहे. प्रशासनाकडून अंदाज पत्रकात उत्पन्नाचे मालमत्ता कर वगळता काही प्रमाणात रिअॅलिस्टिक उत्पन्न दर्शवण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या या सभेत विविध कामांवर तरतुद करण्याकरीता हे आकडे पदाधिकाऱ्यांकडून वाढवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
 
सर्व साधारणपणे जानेवारी अथवा फेब्रुवारीच्या प्रारंभी प्रशासनाकडून अंदाज पत्रक स्थायी समितीकडे पाठवले जाते. स्थायी समितीने सुचवलेल्या बदलानंतर अंतिम मंजुरीसाठी अंदाज पत्रक महासभेकडे पाठवले जाते. मात्र या वर्षी निवडणुकांमुळे अंदाजपत्रकाला मंजुरी दिली नाही. तसेच निवडणुकीनंतर महापौरांची निवड होऊन दोन महिन्यांचा कालावधी होत आला असताना स्थायी समिती अस्तित्वात आल्याने प्रशासनाने अंदाजपत्रक महासभेकडे पाठवले. प्रशासनाने सादर केलेल्या अंदाज पत्रकात महापालिकेचे उत्पन्न वाढणार असल्याचा दावा केला मात्र तरीही मालमत्ता करातून प्रशासनाने दर्शवलेले उत्पन्न तोकडे असल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये आहे. मालमत्ताकराचे जीआयएस प्रणालीद्वारे फेरमुल्यांकनाचे काम सुरु असल्याने तसेच हद्दवाढी पूर्वीच्या महापालिका क्षेत्रात हे काम पूर्ण झाले असून मालमत्तांची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे. तर हद्दवाढीतील गावांमध्ये अद्याप हे काम झालेले नाही. त्यामुळे मालमत्ता करातून ८० कोटी पेक्षा जास्त उत्पन्न महापालिकेला मिळेल, असा विश्वास नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. त्याच बरोबर एलबीटीचे अनुदानातही वाढ होण्याची शक्यता आहे. कारण हद्दवाढ झालेल्या क्षेत्रातील व्यावसायीकांची संख्या लक्षात घेता प्रशासनानेच वर्षाकाठी आठ कोटींचे एलबीटी अनुदान शासनाला मागीतले आहे. त्यामुळे एलबीटी अनुदानातही वाढ होणार आहे. त्यामुळे उत्पन्नाचे आकडे फुगण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे आकडे फुगल्या नंतर उत्पन्न खर्चाचा ताळमेळ जुळवण्यासाठी खर्चातही वाढ करणे आवश्यक असल्याने िवविध विकास कामांवर खर्च वाढवण्याची मागणी महासभेत केली जाईल. 

बोलणारे नगरसेवक किती? 
८०नगरसेवकांमध्ये २५ नगरसेवक पुन्हा निवडुन आलेले आहेत. तर उर्वरित नगरसेवक पहिल्यांदाच निवडुन आले आहेत. तसेच अंदाज पत्रक हा किचकट विषय असल्याने अनेक नगरसेवक फारसे अंदाज पत्रकावर बोलत नाही. विजय अग्रवाल हे महापौर असल्याने त्यांना नगरसेवकासारखे बोलता येणार नाही. त्यामुळेच अंदाज पत्रकावर कोण-कोणते नगरसेवक आपले मत व्यक्त करणार? याबाबत उत्सुकता लागली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...