आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामबंद आंदोलन मिटल्याने मनपाचे कामकाज रुळावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मागील १५ दिवसांपासून सुरू असलेले महापालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन बुधवारी मागे घेण्यात आले. एक महिन्याचे वेतन बुधवारी देण्यात आले, तर येत्या दोन दिवसांत एक महिन्याचे वेतन देण्यात येणार आहे. कामबंद आंदोलन मिटल्याने महापालिकेचे कामकाज रुळावर आले असून, प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
महापालिका कर्मचारी संघर्ष समितीने थकित वेतनासाठी फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाला निवेदन देऊन थकित वेतन मिळाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून थकित वेतन देण्याचे मान्य केले होते. परंतु, प्रशासनाने थकित वेतन दिल्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी २० मे रोजी पुन्हा निवेदन देऊन ७२ तासांत थकित वेतन मिळाल्यास २५ मेपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रशासन तसेच पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, संघर्ष समितीने तीन महिन्यांचे थकित वेतन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्णय घेतला. परिणामी, या आंदोलनावर तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, संघर्ष समितीने आमदार, खासदार, पालकमंत्र्यांचे कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर ताट-वाटी वाजवा आंदोलन केले. आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी कर्मचाऱ्यांना वेतनाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. मंगळवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी एस्क्रो खात्यातील पैसे वेतनासाठी खर्च करण्याच्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुंबईवरून बुधवारी परतल्यानंतर आयुक्तांनी पुन्हा कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली.

या चर्चेत एक महिन्याचे वेतन बुधवारी तसेच एलबीटीचे अनुदान दोन दिवसांत मिळाल्यानंतर पुन्हा एका महिन्याचे तसेच पुढील आठवड्यात एस्क्रो खात्यातील पैसे खर्च करण्याची परवानगी मिळाल्यानंतर तिसऱ्या महिन्याचे आणि १३ व्या वित्त आयोगातून वेतनासाठी पैसा खर्च करण्यास परवानगी मिळाल्यास चौथ्या महिन्याचे वेतन दिले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर मागील १५ दिवसांपासून सुरू असलेले कामबंद आंदोलन दुपारी मागे घेण्यात आले. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कामही जबाबदारीने करावे लागणार
१५ दिवसांपासून कामकाज कोलमडले आहे. विविध विभागांतील वसुलीचे कामही थांबले आहे. त्यामुळे आता संप मिटल्याने कर्मचाऱ्यांना जोमाने आणि जबाबदारीने काम करावे लागणार असून, त्यासाठी प्रशासनही कंबर कसणार असल्याची माहिती मिळाली आहे.

विविध योजनेसह खोळंबली होती कामे
विविधकामे १५ दिवसांपासून बंद आहेत. स्वच्छतागृहाचा दुसरा टप्पा, पंतप्रधान आवास योजनेसह विविध कामे खोळंबली आहेत. या महिन्यात शाळा प्रवेश सुरू झाल्याने अनेकांना जन्म दाखल्यासाठी ताटकळत बसावे लागले होते. त्यामुळे कामबंद आंदोलन मागे घेतल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला.
बातम्या आणखी आहेत...