आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघू व्यावसायिकांना मनपाची परवानगी, दिवाळी साहित्य विक्री प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- प्रशासनाने निश्चित केलेल्या जागेवरच दिवाळी साहित्य विक्रीची दुकाने थाटावी लागतील, ही अट लेखी स्वरूपात मान्य केल्यानंतर लघू व्यावसायिकांना केवळ या वर्षी गांधी मार्गावर दुकाने थाटण्याची परवानगी प्रशासनाने दिली. प्रशासनाच्या या निर्णयामुळे व्यावसायिकांना दर दिवाळीत होणाऱ्या त्रासपासून मुक्तता मिळणार आहे.
प्रशासनाने यावर्षी भाटे क्लबवर दुकाने थाटण्याची परवानगी दिली होती. भाटे क्लबवर होणाऱ्या त्रासामुळे या लघू व्यावसायिकांनी पुन्हा गांधी मार्गावरच दुकाने थाटली होती.
ही दुकाने हटवण्यासाठी अतिक्रमण पथकाने जेसीबी मशिनचा वापर केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे प्रकरण चिघळले आणि अतिक्रमण पथकाला कारवाई करता आली नाही. शुक्रवारी या अनुषंगाने उपमहापौर विनोद मापारी, राजेश मिश्रा, मंजुषा शेळके, शरद तुरकर, देवश्री ठाकरे, योगिता पावसाळे, पंकज गावंडे, राजकुमारी मिश्रा यांनी आयुक्त अजय लहाने यांच्यासोबत चर्चा करून यावर्षी या लघू व्यावसायिकांना व्यवसाय करू देण्याची विनंती केली.
आयुक्तांनी चर्चेअंती पुढील वर्षी महापालिकेने नियोजित केलेल्या ठिकाणीच दिवाळी साहित्य विक्रीची दुकाने थाटली जातील, असे लेखी स्वरूपात हमी पत्र लघू व्यावसायिकांकडून घेतल्यानंतर यावर्षी सुरू असलेल्या जागेवर दुकाने लावण्याकरिता मंजुरी दिली. त्याच बरोबर वाहतुकीस अडथळा होऊ नये, परिसर स्वच्छ ठेवणे आदी दक्षताही या लघू व्यावसायिकांनी घ्यावी, अशी ताकिदही प्रशासनाने लघू व्यावसायिकांना दिली. त्यामुळे दरवर्षी दिवाळी साहित्य विक्रीवरून निर्माण होणारी तेढ पुढच्या वर्षी संपुष्टात येणार असून, व्यापारी प्रतिष्ठानांनाही त्यामुळे दिलासा मिळणार आहे.