आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक ‘एन्ट्री’ वरुन महासभा गाजण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नगरसेवकांना आयुक्तांच्या दालनात जाण्यासाठी व्हिजीटर कार्ड मागण्याचे प्रकरण तसेच साफसफाईची कामे, रखडलेली विकास कामे आदी विविध कारणांमुळे मंगळवारी होणारी महासभा गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सभेत विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
गेल्या काही दिवसापासून नगरसेवकांमध्ये प्रशासना प्रती तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून उत्पन्न वाढीसाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याने महापालिकेच्या निधीतून लहान-सहान कामेही नगरसेवकांना करता येत नाही. तर दुसरीकडे शासन निधीतील झालेल्या विकास कामांचे देयक देण्याबाबत कंत्राटदार नगरसेवकांना त्रस्त करीत आहेत. याच बरोबर साफसफाईची कामे योग्यरित्या होत नसल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. हा सर्व प्रकार सुरु असताना आयुक्तांना नगरसेवकांसाठी राखीव ठेवलेल्या वेळेत भेटण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नगरसेविका उषा विरक यांना व्हिजिटर कार्डची मागणी केल्याने नगरसेवकांच्या नाराजीत वाढ झाली आहे. त्यामुळेच मंगळवारच्या सभेत याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होणाऱ्या या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, महापालिका सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान विकास योजने अंतर्कत डी.आय. पाइप लाइन रोडच्या बाजूने शिफ्ट करण्याचे अंदाज पत्रक मंजुर करणे, पंडीत दिनदयाल अंत्योदय योजनेच्या घटकांर्तगत महापालिका शाळा क्रमांक दोन ची जागा बेघरांसाठी निवारा उभारण्यासाठी देण्याबाबत चर्चा करुन निर्णय घेणे, महापालिकेच्या स्वच्छता आराखडा तयार करण्याबाबत चचा करुन निर्णय घेणे, कॅनॉल रोडचा डीपी रोडमध्ये समावेश करणे, मानसेवी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देणे, मानधनतत्वावरील अब्दुल मतीन यांना मुदतवाढ देणे, अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करणे तसेच महापौरांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयावर चर्चा करुन निर्णय घेणे आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

भितीपोटी बोलती बंद होणार?
प्रशासनाला जाब मागणाऱ्या नगरसेवकांवर यापूर्वीच प्रशासनाने टाच ठेवली आहे. अनेक नगरसेवकांच्या विविध प्रकरणात सतरंज्या अडकल्या असल्याने प्रशासनाने याचा फायदा घेत, काही नगरसेवकांना यापूर्वीच शांत केले आहे. त्यामुळेच सभा गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी काही नगरसेवक भिती पोटी बोलणार नाहीत, अशी चर्चाही महापालिका वर्तुळात सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...