आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांच्या ठरावामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली, शुक्रवारच्या सभेत पडसाद उमटण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - रस्ता निधीतील ७५ लाख रुपयांच्या पाच रस्त्यांचा प्रस्ताव महापौर उज्ज्वला देशमुख यांनी प्रशासनाकडे पाठवल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. यात विरोधकांनीही उडी घेतल्याने या प्रकरणात महापौर एकाकी पडण्याची शक्यता असून, शुक्रवारी होणाऱ्या महासभेत या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
पाच कोटी ७५ लाख रुपयांचा रस्ता निधी महापालिकेला मंजूर झाला आहे. हा निधी पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी मंजुर करून दिला. यातून दोन कोटी रुपये रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरलेल्या विद्युत खांब हलवण्यासाठी खर्च केले जाणार आहेत. तर उर्वरित रकमेतून पालकमंत्र्यांनी मुख्य रस्ते सुचवल्यावर महासभेने गल्लीबोळातील रस्त्यांवर खर्च करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उर्वरित रक्कम महापालिकेला अद्याप प्राप्त झालेली नाही. मात्र, यापैकी ७५ लाख रुपये या खात्यात आहेत. ही बाब लक्षात घेऊनच महापौर उज्वला देशमुख यांनी त्यांच्या प्रभागासह तीन नगरसेवकांच्या प्रभागात रस्त्याची कामे मंजूर करून तसा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला. याबाबत सत्ताधारी गटातील पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नगरसेवक अनभिज्ञ होते. परंतु, महापौरांनी असा प्रस्ताव पाठवल्याची चर्चा पसरली. त्यामुळे सत्ताधारी गटातील पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. हा प्रकार चुकीचा असल्याचे मतही अनेक नगरसेवकांनी व्यक्त केले. सत्ताधारी गटातच जुंपल्याने विरोधकांनीही यात उडी घेतली. महापौरांनी मंजुर करुन पाठवलेला प्रस्ताव रद्द करण्याची मागणी देखील विरोधकांनी केली. तसेच शुक्रवारी होणाऱ्या सभेत याचा जाब विचारला जाईल, असा इशाराही विरोधकांनी दिला. परिणामी शुक्रवारच्या सभेत या विषयावर गरमागरम चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सभा वादळी होऊ शकते.
महापौर पुन्हा एकाकी
भाजपने साडेसात वर्षांनी सत्ता ताब्यात घेतल्यापासून महापौर एकाकी पडण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीही महापौर सत्ताधारी गटात सरळ दोन गट पडले होते. मात्र, स्थायी समिती सभापतीची निवडणूक झाल्यानंतर ही दुरी कमी झाली होती. परंतु, या प्रस्तावामुळे पुन्हा दरी वाढण्याची शक्यता असून, महापौर पुन्हा एकदा एकाकी पडतील, अशी चर्चा या निमित्ताने सुरु आहे.
बातम्या आणखी आहेत...