आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मिशन २६’चा अकोला मनपा स्थायीकडून गौरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शिवसेना वसाहतीसारख्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात समाविष्ट असलेल्या महापालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या ‘मिशन २६’बद्दल स्थायी समितीच्या १८ मार्चला झालेल्या सभेत अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. या मिशनबद्दल दिव्य मराठी, प्रभात किड्स, मायबोली कोचिंग क्लासेस, श्री रेणुका माता मित्र मंडळ आदींसह मदत करणाऱ्या विविध संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांचे स्थायी समितीने आभारही मानले.

स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक सतीश ढगे यांनी महापालिका शाळांच्या दुर्दशेबाबत नाराजी व्यक्त केली. महापालिकेची शिवसेना वसाहतीतील शाळा क्रमांक २६ शैक्षणिक दर्जा उंचावू शकते तर इतर का नाही? असा प्रश्न उपस्थित करून या भागाचे नगरसेवक दिलीप देशमुख यांचे विशेष अभिनंदन केले. सतीश ढगे यांनी केलेल्या अभिनंदनानंतर दिलीप देशमुख यांनी शाळेला दहाव्या वर्गाची मंजुरी दिल्याबद्दल प्रशासन, पदाधिकारी, माजी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
आतापर्यंत प्रशासनाचेही सहकार्य नव्हते. मात्र, आयुक्त अजय लहाने यांनी वर्गखोल्या, विज्ञान प्रयोगशाळा आदींसाठी भरीव मदत केल्याचेही स्पष्ट केले. तसेच शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी दिव्य मराठी, प्रभात किड्स, मायबोली कोचिंग क्लासेस, श्री रेणुका माता मित्र मंडळ, रेडक्रॉस सोसायटी आदींसह विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते आदींनी पुढाकार घेतला. त्यामुळे दहावीतील विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनासह विविध सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकल्या. एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन गुणवत्तेत टॉप येणाऱ्या नऊ मुलींच्या निवासाची, भोजनाची व्यवस्था चांगल्या ठिकाणी करण्यात आली. त्यामुळे या गरीब विद्यार्थ्यांना कोणतीही अपेक्षा ठेवता नि:स्वार्थपणे सेवा करणाऱ्या या सर्व संस्थांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर करावा, यामुळे या सर्व संस्थांचा उत्साह वाढेल आणि इतर संस्थाही महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नगरसेवक दिलीप देशमुख यांनी मांडलेला हा अभिनंदनाचा प्रस्ताव सभापती विजय अग्रवाल यांनी सभेत मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी टेबल वाजवून हा अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करतानाच 'मिशन २६'मधील सहभागी सर्वांचे आभारही मानले.

दिलीप देशमुखांना आले गहिवरून
सभेत 'मिशन २६' बद्दल बोलताना दिलीप देशमुख यांना गहिवरून आले होते. माझ्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना स्कूल बसमध्ये बसता येईल, त्यांना सर्व सुविधा मिळतील, असे मी स्वप्नातही पाहिले नव्हते. आज या शाळेतील विद्यार्थी खूप आनंदात आहेत, खूप मन लावून अभ्यासही करत आहेत, असे सांगताना दिलीप देशमुख यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
बातम्या आणखी आहेत...