आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोट पोलिस दंडवसुलीत आघाडीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या विविध वाहनांवर अकोट शहर पोलिसांनी कारवाई करून मागील वर्षभरात सात लाखांवर दंड वसूल केला आहे. या दंडवसुलीमध्ये अकोट शहर पोलिस ठाणे जिल्ह्यात अव्वल आले आहे.
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या नेतृत्वात पोलिस कर्मचाऱ्यांनी वर्षभरात अनेक दुचाकी, चारचाकी आदी वाहनांची तपासणी केली. यादरम्यान अवैध प्रवासी वाहने आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली. वाहतुकीचा परवाना नसणे, अल्पवयीन वाहनचालक, ट्रिपल सीट वाहन आदी प्रकारांबाबतही दंड वसूल करण्यात आला. यानुसार सन २०१५ मध्ये पोलिसांनी सात लाख एक हजार रुपयांचा दंड वसूल केला. जिल्ह्यातील ही विक्रमी दंडवसुली ठरली. पोलिसांनी या वसुलीसोबतच अनेक प्रकरणे न्यायालयातही दाखल केली. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ६४१ वाहनांवर मोटार वाहन कायद्याच्या कलम ६६/१९२ नुसार कारवाई करण्यात आली. त्यातील २० प्रकरणांमध्ये २२ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. इतर ६२१ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली. फॅन्सी नंबरप्लेट, ट्रिपल सीट आदी प्रकारांबाबत पाच हजार २५४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या सर्व वाहनचालकांकडून सहा लाख ७८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

अवैधप्रवासी वाहतुकीला पायबंद : अवैधप्रवासी वाहतुकीस पायबंद घालण्यासाठी मागील वर्षापासून शहर पोलिसांनी विविध कारवाया केल्या आहेत. बसस्थानकापासून २०० मीटरच्या आत उभ्या असलेल्या खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. काळी-पिवळी टॅक्सी, टप्पा वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस या वाहनांवरही पोलिसांनी कारवाई केल्याने परिसरात ही वाहने कमी झाली आहेत. दरम्यान, अपघात टाळण्यासाठी अल्पवयीन मुलांनी वाहने चालवू नयेत, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

बसफेऱ्या वाढवाव्यात
^खासगी वाहनांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात एसटीने बसफेऱ्या वाढवून प्रवाशांना सुविधा द्यावी.'' भास्कर मंगळे, प्रवासी

... तर कारवाई करणार
^शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध प्रवासी वाहतूक बंद करायची आहे. नियमांचे पालन करून वाहनचालकांनी वाहतूक करावी. नियमांचा भंग केल्यास कारवाई केली जाईल.'' कैलास नागरे, पोलिसनिरीक्षक