आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला झोनमध्ये धावताहेत १५ रुग्णवाहिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अत्यंत अडचणीच्या वेळी आरोग्यविषयक मदत पोहोचवणाऱ्या जीवनवाहिनीने आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यातील ११५५ रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. भारत विकास ग्रूपच्या मदतीने राज्य शासनातर्फे हा उपक्रम चालवला जातो. आरोग्यविषयक गुंतागुंतीची स्थिती उद्भवली की नागरिकांनी १०८ क्रमांकाला फोन करायचा आणि त्याद्वारे रुग्णवाहिकेची मदत मिळवून घ्यायची, असा हा उपक्रम आहे. मुळात गाव-खेड्यांमध्ये असलेले ओबडधोबड रस्ते आणि त्यामुळे रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचण्यास होणारा विलंब यामुळे बरेचदा रुग्ण प्राणास मुकायचे. त्यामुळे वाहनात बसवण्याबरोबरच रुग्णाला आरोग्य सेवा प्राप्त व्हावी, अशी सोय याद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्याची व्याप्ती लक्षात घेता या यंत्रणेने १५ रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या आहेत. आरोग्य केंद्रे आणि दूरवर असलेली गावे यांच्यात महत्वाचा दुवा म्हणून या रुग्णवाहिका कामे करतात. संबंधितांनी फोन केला की काही मिनीटात हे वाहन उपलब्ध व्हावे, अशी या यंत्रणेची बांधणी आहे. विशेष असे की हा फोन टोल फ्री आहे. त्यामुळे त्यासाठी कोणताही खर्च संबंधितांना उचलावा लागत नाही. प्रारंभी ही वाहने केवळ खेडेगावांतील गरोदर महिलांच्याच मदतीसाठी आहेत, असा समज होता. मात्र आता या वाहनांची सेवा उपलब्धतेनुसार सर्वच प्रकारच्या गंभीर रुग्णांना दिली जात आहे.

रस्ते महामार्गांवर होणारे घात-अपघात आणि वयोवृद्ध व्यक्तींना रात्री-अपरात्री होणारा गंभीर त्रास अशा अडचणींच्या वेळीही या वाहनांचा वापर केला जात आहे.

हार्ट रुग्णांना मदत
^अकोला विभागाच्यादिमतीला १५ रुग्णवाहिका आहेत. विशिष्ट वेळानंतर बदलणाऱ्या शिफ्टमध्ये ते कामे करतात. याशिवाय जीवन रक्षक प्रणालीची सर्व उपकरणेही या वाहनात असतात. यांपैकी चार अॅम्बुलन्स या हृदयरुग्णांसाठीच्या आहेत. ’’ डॉ.टिकेश बिसेन, प्रादेशिक व्यवस्थापक, भारत विकास ग्रूप, अकोला.

या रुग्णांना मदत
ऑगस्ट २०१६ मध्ये वैद्यकीय उपचाराची गरज असलेल्या ४८५ जणांना सेवेचा लाभ झाला. त्याखालोखाल दुर्धर आजार जडलेल्या ४३३ आणि वेगवेगळ्या कारणांनी विषबाधा झालेल्या १०० रुग्णांना या जीवनवाहिनीची मदत मिळाली. अपघातातील जखमी ५५, इतर आजारांनी ग्रस्त ३२, उंचावरुन पडल्याने जखमी झालेले २७, हल्ला झालेल्या जणांना मदत मिळाली.
बातम्या आणखी आहेत...