Home | Maharashtra | Vidarva | Akola | amrut work in akola

अखेर ‘अमृत’­चा मार्ग मोकळा, याच महिन्यात सुरु होणार काम

प्रतिनिधी | Update - Oct 06, 2017, 10:12 AM IST

महापालिकेच्या गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेल्या अमृत योजनेतील पाणी पुरवठा सबलीकरणाच्या कामाला अखेर राज्य शासनाने हिरवा

 • amrut work in akola
  अकोला - महापालिकेच्या गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेल्या अमृत योजनेतील पाणी पुरवठा सबलीकरणाच्या कामाला अखेर राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे या महत्वाकांक्षी परंतु महापालिकेला आर्थिक संकटात टाकणाऱ्या योजनेचे काम या महिन्यात सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजने अंतर्गत ८७ कोटी रुपयाची विविध कामे केली जाणार आहेत.
  अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात ११० कोटी रुपये मंजूर झाले. यात जलकुंभ बांधणे, पाईप लाइन बदलणे, ज्या भागात पाईप लाइन नाहीत, त्या भागात पाईप लाइन टाकणे, जोडणी करणे, चाचणी देणे आदी ८७ कोटी रुपयाच्या कामाच्या निविदा २९ ऑक्टोंबर २०१६ ला बोलावल्या होत्या. यात एक कंपनीची निविदा सहा टक्के जादा दराची परंतू सर्वात कमी दराची निविदा प्राप्त झाली. मंजुरीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्या नंतर २३ मार्च २०१७ ला संबंधित कंपनीला मुद्रांक शुल्क तथा सुरक्षा ठेव सादर करण्याचे प्रशासनाने कळवले. या पत्रावर संबंधित कंपनीने तब्बल २० दिवसानंतर ११ एप्रिल २०१७ ला निविदेमध्ये घेण्यात आलेले पाईपचे दर हे, अबकारी कर वगळून घेण्यात आलेले आहेत. एक जुलैला जीएसटी लागू होणार असल्याने पाईपच्या किमतीमध्ये बाजार भावामध्ये बरीच तफावत येत आहे.

  त्यामुळे निविदेतील प्रस्तावित दर जीएसटी लागू झाल्या नंतर संभाव्य दरामधील फरकाच्या रकमेबाबत महापालिकेची भूमिका स्पष्ट झाल्या नंतर कार्यारंभ करु, असे पत्र दिले होते. या अनुषंगानेच प्रशासनाने या आशयाची टिप्पणी महासभेकडे पाठवली होती. सभेत या विषयावर जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी शासनाच्या परिपत्रकाचा हवाला देत फेर निविदा बोलावण्याची मागणी केली. परंतु सत्ताधारी गटाने फरकाची रक्कम महापालिकेच्या तिजोरीतून भरण्याचा निर्णय घेतला. ही प्रस्ताव पाठवून दोन महिने झाले होते.परंतु राज्य शासनाच्या मंजुरीमुळे वर्क ऑर्डर देण्याचे काम रखडले होते. अखेर ऑक्टोंबर मंजुरीचे पत्र मिळाल्याने या योजनेच्या कामाला आता लवकरच प्रारंभ होणार आहे.
  या भागात टाकणार नवीन जलवाहिन्या
  आदर्शकॉलनी, अकोट फैल, नवीन बसस्थानक, डाबकी रोड, हरीहरपेठ, हिंदी शाळा, केशव नगर, महाजनी प्लॉट, टेंपल गार्डन शाळा, नेहरु पार्क चौक, श्रद्धा नगर, तोष्णीवाल ले-आऊट, शिव नगर या झोन मध्ये १९४.८५ किलो मीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकल्या जाणार अाहेत.
  या भागात जलकुंभ
  कौलखेड भागातील श्रद्धा नगर, टेम्पल गार्डन शाळा, अकोट फैल भागात २, हरीहरपेठ, डाबकी रोड भागात २, शिवनगर या भागात हे जलकुंभ बांधले जाणार आहेत. या नव्या जलकुंभामुळे एकुण कोटी ४६ लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण होईल.
  अशी कामे असा खर्च
  वर्कींग सर्वे - ५० लाख, व्ही.टी.पंप बदलवणे - ५२ लाख, व्हॉल्व अॅक्च्युएटर कोटी ७२ लाख, शुद्ध पाण्याची लिडिंग मेन (उंच टाक्याकरीता) १० कोटी ४८ लाख, आठ जलकंुभ ११ कोटी ३५ लाख, जुनी वितरण व्यवस्था बदलवणे (पाईप लाईन) ३६ कोटी लाख, नविन जलवाहिन्या टाकणे - ३१ कोटी ८७ लाख, स्काडा ऑटोमेशन १० कोटी ३१ लाख, सोलर पॉवर प्लॉन्ट -८ कोटी लाख खर्च अपेक्षित आहे.

Trending