आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जलयुक्त’ शिवारात आमदार ठाकूर, निवेदिता चौधरी यांच्यामध्ये जुंपली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा - जलयुक्त शिवार योजनेअंतर्गंत करण्यात येणाऱ्या विविधकामांचे भूमिपूजन निधी आणण्याचे श्रेय लाटण्याच्या वादातून आमदार अॅड. यशोमती ठाकूर भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी (दिघडे) यांच्यात शनिवारी (दि. २५) चांगलीच हमरीतुमरी झाली. घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाल्यामुळे दक्षता म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही नेत्यांनी पोलिस ठाण्यात परस्परविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.
तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील पिंगळाई नदीवर पूर संरक्षक भिंत, नदीचे रुंदीकरण खोलीकरणाच्या कामासाठी ७९.५९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास आयोजन करण्यात आले होते. यासाठी तळेगाव ठाकूर येथील सरपंच श्रीकृष्ण बांते उपसंरपच सतीश पारधी यांनी आमदार अॅड. यशोमती ठाकूर, भाजपच्या नेत्या निवेदिता चौधरी यांना निमंत्रित केले होते. या कामाचे उद््घाटन आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार होते. कार्यक्रमानुसार निवेदिता चौधरीही ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झाल्या होत्या. यावेळी भाजप कॉंग्रेसचे स्थानिक नेते कार्यकर्तेही उपस्थित होते. उद््घाटन स्थळी दोन्ही नेत्या पोहोचल्यानंतर आमदार ठाकूर यांनी भूमिपूजनाला सुरवात केली. दरम्यान, चौधरी यांनी कार्यकारी अभियंता क्षीरसागर यांना पावसाळ्याचे दिवस असताना उद््घाटनाची घाई कशाला केली. आपण पालकमंत्र्यांना बोलावले असते असे म्हटले. यावरून आमदार ठाकूर चौधरी यांच्या चांगलीच तू-तू-मै-मै झाली. यातूनच निधी आणण्यापासून काम मंजूर करण्याच्या प्रक्रियपर्यंतच्या कामाचे श्रेय लाटण्यावरून दोन्ही महिला नेत्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली . त्यानंतर आमदार ठाकूर काम सुरू करण्यासाठी जेसीबीवर चढल्या असता कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दगड फेकला. या दगडामुळे जेसीबीचा काच फुटला. सुदैवाने आमदार ठाकूर यातून बचावल्या. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. यातून चौधरी यांच्या काही समर्थकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्यानंतर ठाकूर समर्थकांनीही जय श्रीरामच्या घोषणा देऊन प्रत्युत्तर दिले. काही कार्यकर्त्यांनी घटनेची माहिती तिवसा पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर आमदार ठाकूर यांनी निवेदिता चौधरी यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. घटनेची माहिती दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्याने ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. अनुचित घटना टाळण्यासाठी कडेकोट बंदोबस्तामुळे ठाण्याला छावणीचे स्वरुप आले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीनिवास घाडगे घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी दंगा नियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. बंदोबस्तासाठी कुऱ्हा , माहुली, शिरखेड, चांदूर रेल्वेसह परिसरातील ठाण्यांमधून कुमक मागविण्यात आली होती. दरम्यान, ठाकूर यांनी चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी करून पोलिस संरक्षणाची मागणी केली. ठाकूर यांच्या तक्रारीवरून चौधरी यांच्याविरुद्ध भादंवि ३३६, ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ठाकूर समर्थकांनी घोषणाबाजी केल्यानंतर आमदार ठाकूर निघून गेल्या. काही वेळानंतर निवेदिता चौधरी आपल्या समर्थकांसह ठाण्यात आल्या. चौधरी यांच्या तक्रारीवरून ठाकूर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

आमदार अॅड. यशोमती ठाकूर भाजपच्या नेत्या निवेदिता चौधरी यांच्यात वाद झाल्यानंतर पोलिस ठाण्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे ठाण्यामध्ये असा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

माझ्याविरुद्ध खोटी तक्रार
^नियमानुसार मी जलयुक्त शिवार योजनेची अध्यक्ष असल्यामुळे उद््घाटन माझ्या हस्ते होणे आवश्यक होते. त्यानुसार मी भूमिपूजन केले. परंतु, यावेळी चौधरी यांनी व्यत्यय आणून माझ्या अंगावर आल्या. मी कुणालाही शिवीगाळ केली नसून, त्यांनी माझ्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली आहे. अॅड.यशोमती ठाकूर,आमदार, तिवसा.

आमदार ठाकूर यांनी घाई केली
^प्रोटोकॉलनुसार पालकमंत्री भाजप पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित असणे आवश्यक होते. परंतु, आमदार यशोमती ठाकूर यांनी उद््घाटनाची घाई केली. त्यानंतर ठाकूर यांनी पालकमंत्री पक्षासंबंधी अपशब्द वापरले. निवेदिताचौधरी, माजी जिल्हाध्यक्षा, भाजप.
बातम्या आणखी आहेत...