आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पोर्ट्स बाइकच्या अनियंत्रित गतीमुळे पादचारी अन् चालकही गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेव्हन हिल्स उड्डाणपुलाजवळ मंगळवारी सायंकाळी झालेल्या अपघातात चुराडा झालेली दुचाकी. - Divya Marathi
सेव्हन हिल्स उड्डाणपुलाजवळ मंगळवारी सायंकाळी झालेल्या अपघातात चुराडा झालेली दुचाकी.
औरंगाबाद : अनियंत्रित वाहने, रस्त्यावरील पथदिवे बंद असणे वा अंधुक प्रकाश आणि नागरिकांकडून दुभाजकांतून जाणाऱ्या वाटेचा वापर यामुळे जालना रोडसह शहरात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकही ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने दरदिवशी असे अपघात होत आहेत.
 
मंगळवारी सेव्हन हिल्स उड्डाणपुलाजवळील एअर इंडिया कार्यालयासमोर रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला भरधाव दुचाकीने ठोकरले. यात पादचाऱ्यासह दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला असून दोघांवरही एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. सुभाष श्रीधर साळुंके (४५, रा. रेणुकामाता मंदिर, टीव्ही सेंटर) दुचाकीस्वार युवराज रोहिदास चव्हाण (२५, रा. शेवगा, ता. औरंगाबाद) अशी जखमींची नावे आहेत. 
 
सुभाष साळुंके हे सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान सेव्हिन हिल्स परिसरात आले होते. यादरम्यान ते एअर इंडियाच्या कार्यालयासमोरील रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात होते. परंतु सिडको बसस्थानकाकडून आलेल्या भरधाव दुचाकीने (एमएच २० डी ८८९८) त्यांना धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार युवराजही लांब फेकला गेला, तर साळुंके जागीच कोसळून गंभीर जखमी झाले. यामुळे काही काळ जालना रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.
 
लोकांनी तत्काळ दोघांनाही एमजीएम रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरापर्यंत पुंडलिकनगर पोलिस चौकीमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली नव्हती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, साळुंके यांना गंभीर इजा झाली असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात अाले आहे. नातेवाइकांनी सांगितल्यानुसार, साळुंके यांचा हडको परिसरात डेअरीचा व्यवसाय आहे. 
 
भरधाववेग, दुचाकीचा ताबा गेला : प्रत्यक्षदर्शींनीसांगितल्यानुसार, सातच्या सुमारास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होती. यात युवराजची स्पोर्ट बाइक असल्याने सामान्य दुचाकीपेक्षा त्याच्या दुचाकीचा वेग अधिक होता. 
 
साळुंके दुचाकीसमोर येत असल्याचे दिसताच युवराजने वेगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याची दुचाकी साळुंके यांना धडकली. धडकेनंतर युवराजचा दुचाकीवरचा ताबा सुटून तोही दूरवर फेकला गेला. त्यामुळे तोही गंभीर जखमी झाला. तर साळुंके दुचाकीसोबत काही अंतरापर्यंत फरपटत गेल्याने तेसुद्धा गंभीर जखमी झाले. युवराजच्या दुचाकीच्या पुढील भागाचा चुराडा झाला. 
 
गांभीर्य कोणालाच नाही 
दुभाजक ओलांडण्याच्या प्रयत्नात शहरात अनेक अपघात झाले आहेत. अनेकांना प्राणही गमवावा लागला. मात्र नागरिक शॉर्टकट म्हणून दुभाजकांतील मोकळ्या जागेतून वाहने चालवतात. पादचारीही अशा मार्गांचा वापर करतात. शहरात काही ठिकाणी स्काय वॉकही आहेत. मात्र त्याचा पादचारी वापर करत नाहीत. वारंवार होत असलेल्या अपघातांचे ना नागरिकांना गांभीर्य ना प्रशासकीय यंत्रणेला, अशी परिस्थिती आहे. 
 
दुचाकींच्या धडकेची रुग्णालयात नोंद 
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, साळुंके रस्ता ओलांडत असताना त्यांना दुचाकीची धडक बसली. मात्र, रुग्णालयामध्ये दोन दुचाकींच्या धडकेने हा अपघात झाल्याची नोंद करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुंडलिकनगर पोलिस चौकीमध्ये रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्यात आली नव्हती. 
 
पथदिव्यांचा प्रकाशच पडेना 
जालना रस्त्यावरील अर्धेअधिक पथदिवे बंद आहेत. अपघात झालेल्या ठिकाणी काही पथदिवे सुरू असले तर प्रकाश मंद आहे. यामुळे सायंकाळी अंधारात वाहनचालकांना रस्ता ओलांडणारे दिसत नाहीत. हायकोर्टाजवळील सिग्नल सुटताच वाहने सेव्हन हिल्स पुलाकडे सुसाट वेगाने जातात. 
 
- धडकेनंतर दुचाकीस्वार दूरवर फेकला गेल्याने झाला जखमी 
- सेव्हन हिल्स येथे अपघात, पथदिव्यांचा उजेड नसल्याने जालना रस्त्यावर अंधार 
- अंधार आणि पथदिव्यांच्या मंद प्रकाशामुळे घडताहेत अपघात 
 
बातम्या आणखी आहेत...