आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामानाचा पक्ष्यांच्या जीवनमानावर परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम- एकीकडे पक्षी गणनेसाठी शासनाकडून विविध प्रयत्न होत आहेत. तर दुसरीकडे हवामानाच्या बदलामुळे विविध पक्ष्यांच्या प्रजातींना धोका निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी यंदा परदेशातून येणारे पाहुणे पक्षी अधिक आढळून आले नाही. काही पक्षिमित्रांच्या सर्वेक्षणात ही बाब प्रामुख्याने पुढे आली आहे. जागतिक हवामान बदल त्याचे प्रमुख कारण सांगितले जात आहे.
जागतिक पक्षी गणना दिन नुकताच झाला. देशभरातून त्यासाठी पक्षी गणना करण्यात आली. त्यासाठी पक्षिमित्र तसेच पक्ष्यांसाठी कार्य करणाऱ्या काही संस्थांनी हिरिरीने सहभाग घेतला होता; परंतु गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मात्र पक्ष्यांची संख्या खूप कमी आढळल्याचा अंदाज काही पक्षिमित्रांनी काढला. जागतिक हवामानात झालेला बदल हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे पक्षितज्ज्ञांना वाटते. ग्लोबल वाॅर्मिंगमुळे हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे काही देशांमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. त्याचा दुष्परिणाम पक्ष्यांच्या संख्येवर झाला आहे. एवढेच नव्हे तर काही वर्षांपासून जागतिक हवामानात बदल झाल्यामुळे काही वनस्पती त्यावर उपजीविका करणारे कीटकही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे हे कीटक काही पक्ष्यांचे मुख्य आहार आहे. छोट्या सजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम आता पक्ष्यांवर होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखणे हाच त्यावर अंतिम तोडगा आहे. त्यासाठी पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेणे गरजेचे असून, इतरांनीही त्याला सहकार्य केले पाहिजे, अशी अपेक्षा पक्षिमित्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान पक्षी वाचवण्याबाबत समाजातही जनजागृती होणे आवश्यक असून, नागरिकांनीही विविध प्रयत्न तसेच उपक्रम त्यासाठी आयोजित करण्याची आवश्यकता आहे.

वृक्षतोडीमुळेही नुकसान
कार्बनडायऑक्साइडचेप्रमाण वाढत आहे. शिवाय वृक्षतोडही वाढली आहे. त्याचा परिणाम वातावरणावर होत आहे. त्यामुळेच जागतिक हवामानात बदल होत आहे. त्याचा परिणाम पक्ष्यांच्या खाद्यपदार्थांवर होताे. त्यामुळे परदेशी पाहुणे लवकर स्थलांतर करतात. त्यामुळे पर्यावरण वाचवण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. मिलिंद सावदेकर, पक्षिमित्र

दुष्काळही कारण
निसर्गाच्याअवकृपेमुळे राज्यात अनेक ठिकाणी यंदा पाऊस झालेला नाही. त्यामुळे कृत्रिम जलस्रोतही आटण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अनेक पक्ष्यांनी स्थलांतर केले आहे. विशेष म्हणजे एेन हिवाळ्यात ही स्थिती आहे. अजून उन्हाळा शिल्लक असल्यामुळे त्या वेळी काय प्रसंग उभा राहील याबाबत पक्षिमित्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण आहे.

सोहोळ अभयारण्याबाबत वन विभागही गंभीर नाही
कारंजा शहरापसून काही अंतरावरच सोहोळ हे अभयारण्य आहे. या ठिकाणी अनेक वन्य पशू-पक्षी आहेत; परंतु या ठिकाणी असलेल्या पाणवठ्यांमध्येही कमी पाणी आहे. असे असताना वन विभागाने मात्र कृत्रिम पाणवठे उभारलेले नाही. वन्य प्राण्यांच्या देखभालीसोबत अभयारण्यात पक्ष्यांकडेही दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. उपाययोजना आवश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...