आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅरेक्टर व्हेरिफिकेशनच्या नावाखाली बँक मॅनेजरने बनवले वकील तरुणीचे बनावट फेसबूक अकाऊंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- युनियन बँकेतील मॅनेजरने वकील युवतीला आधी लग्नाची मागणी घातली. त्यानंतर तिचे चारित्र्य पडताळणी करण्यासाठी त्याने तिच्या नावाने बनावट फेसबूक अकाऊंट बनवले. वकील युवतीला बनावट अकाऊंटबाबत कळताच तिने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी थेट अमेरिकेतील फेसबूकच्या कार्यालयाशी संपर्क साधला अणि मॅनेजरला बेड्या ठोकल्या.

आरोपी मॅनेजरला सिव्हिल लाइन्स पोलिस व सायबर क्राईम शाखेने उत्तर प्रदेशातून अटक केली.
अकोला कोर्टात प्रॅक्टीस करीत असलेल्या वकील युवतीला गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात युनियन बँकेत मॅनेजर असलेल्या शिवणी येथील निलेश प्रमोद अबघड (वय- 26) युवकाने लग्नाची मागणी घातली होती. मात्र युवतीने नकार दिला होता. तेव्हापासून या युवकाने तिच्या नावाने बनावट फेसबूक अकाऊंट उघडले व तिच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू लागला. त्यानंतर तो बदनामीकारक मजकूर अपलोड करू लागला. सुरुवातीला युवतीच्या एका डॉक्टर मित्रालाही तो पोस्ट पाठवू लागला. त्यानंतर डॉक्टर आणि इतर मित्रांच्या मार्फत ही बाब वकील युवतीला कळली होती. तसेच युवतीलाही अनेक पोस्ट पाठवू लागला. त्यानंतर युवतीने थेट सिव्हिल लाइन्स पोलिस ठाणे गाठले व पोलिस निरीक्षक अन्वर एम. शेख यांच्याकडे तक्रार केली. पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेत कलम 43, 66 सी, आयटी अॅक्टसहकलम 419,500 भांदविनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखा व सिव्हिल लाइन्स पोलिस संयुक्तपणे करीत असताना फेसबूक कार्यालयाच्या माध्यमातून युनियन बँकेचा मॅनेजर निलेश अबघड याला उत्तर प्रदेशातून सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र जांभुळे, संतोष शेखरवार यांनी अटक केली.  तर या प्रकरणाचा छळा पोलिस निरीक्षक अन्वर एम. शेख व सायबर सेलचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ, अतुल अजने यांनी लावला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ रवींद्र पवार व उमेश पाटील करीत आहेत.
 
तरुणीने निलेशविषयी शक्यता फेटाळली होती
पोलिसांनी तरुणीची सखोल विचारपूस केली असता निलेश अबघडने दोन वेळा लग्नाची मागणी घातल्याची माहिती दिली होती. मात्र तो बनावट फेसबूक अकाऊंट काढणार नाही, अशी खात्री तिला होती. त्यामुळे पोलिसांनी अमेरिकेतील फेसबूक कार्यालयाशी संपर्क साधत त्यांच्याकडून आयपी अॅड्रेस मिळवला व आरोपी निलेश अबघड असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला पकडले.
 
आरोपी म्हणतो चारित्र्य पडताळणी करायची होती
आरोपीला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याला युवतीसोबत लग्न करायचे असल्याने आपण तिचे चारित्र्य पडताळणी करण्यासाठी फेसबूक अकाऊंट बनवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यासाठी त्याने उत्तर प्रदेशातून 500 रुपयांत तरुणीच्या नावाने मोबाइल सिमकार्डही घेतले होते, अशी कबुली त्याने दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...