आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक मॅनेजरने बनवले युवतीचे बनावट ‘फेसबुक अकाऊंट’, तिचे 'चारित्र्य' पाहण्‍यासाठी खटाटोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- उत्तरप्रदेशात युनियन बँकेत मॅनेजर असलेल्या तरुणाने अकोल्यातील एका वकील युवतीला आधी लग्नाची मागणी घातली. त्यानंतर तिचे चारित्र्य पडताळणी करण्यासाठी त्याने तिच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट बनवले. बनावट अकाऊंटबाबत कळताच तिने पोलिसात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी थेट अमेरिकेतील फेसबुकच्या कार्यालयाशी संपर्क साधला अाणि मॅनेजरला सिव्हिल लाइन्स पोलिस सायबर क्राईम शाखेने उत्तर प्रदेशातून अटक केली.
 
अकोला न्यायालयात प्रॅक्टीस करीत असलेल्या एका वकिल युवतीला गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात युनियन बँकेत मॅनेजर असलेल्या शिवणी येथील निलेश प्रमोद अबघड (वय २६) या युवकाने लग्नाची मागणी घातली होती. मात्र युवतीने नकार दिला होता. तेव्हापासून या युवकाने तिच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले तिच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू लागला. त्यानंतर तो बदनामीकारक मजकूर अपलोड करू लागला. सुरुवातीला युवतीच्या एका डॉक्टर मित्रालाही तो पोस्ट पाठवू लागला. त्यानंतर डॉक्टर आणि इतर मित्रांच्या मार्फत ही बाब वकिल युवतीला कळली होती. तसेच युवतीलाही अनेक पोस्ट पाठवू लागला. त्यानंतर युवतीने थेट सिव्हिल लाइन्स पोलिस ठाणे गाठले पोलिस निरीक्षक अन्वर एम. शेख यांच्याकडे तक्रार केली. पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेत कलम ४३, ६६ सी, आयटी अॅक्ट सहकलम ४१९,५०० भादंवि नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
 
या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखा सिव्हिल लाइन्स पोलिस संयुक्तपणे करीत असताना फेसबुक कार्यालयाच्या माध्यमातून युनियन बँकेचा मॅनेजर निलेश अबघड याला उत्तर प्रदेशातून सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र जांभुळे, संतोष शेखरवार यांनी अटक केली. तर या प्रकरणाचा छडा पोलिस निरीक्षक अन्वर एम. शेख सायबर सेलचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ, अतुल अजने यांनी लावला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ रवींद्र पवार उमेश पाटील करीत आहेत.
 
१५ जुलै पर्यंत पोलिस कोठडी
दरम्यान या प्रकरणातील आरोपी बँक मॅनेजर निलेश अबघड याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १५ जुलै पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आज काल शहरी भागासह ग्रामीण भागातील बहुतांश तरुण-तरुणी तसेच सर्वसामान्य नागरिकाजवळ मोबाइल अाहे. मोबाइलवर सर्रास सोशल मीडियाचा वापर केला जात असला तरी अनोळखी व्यक्तींना मित्र बनवू नये, तसेच खात्री करूनच एकमेकांशी संवाद साधावा, कोणत्याही प्रकारे खोटी माहिती पसरवू नये, असा सल्ला यानिमित्ताने पोलिस निरीक्षक अन्वर एम. शेख यांनी दिला आहे.
 
युवतीने निलेश विषयी शक्यता फेटाळली होती  
पोलिसांनी युवतीची सखोल विचारपूस केली असता निलेश अबघडने दोन वेळा लग्नाची मागणी घातल्याची माहिती दिली होती. मात्र तो बनावट फेसबुक अकाऊंट काढणार नाही, अशी खात्री तिला होती. त्यामुळे पोलिसांनी अमेरिकेतील फेसबुक कार्यालयाशी संपर्क साधत त्यांच्याकडून आयपी अॅड्रेस मिळवला आरोपी निलेश अबघड असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला पकडले.
 

आरोपी म्हणतो चारित्र्य पडताळणी करायची होती
आरोपीला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याला युवतीसोबत लग्न करायचे असल्याने आपण तिचे चारित्र्य पडताळणी करण्यासाठी फेसबुक अकाऊंट बनवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यासाठी त्याने उत्तर प्रदेशातून ५०० रुपयांत युवतीच्या नावाने मोबाइल सीमकार्डही घेतले होते, अशी कबुली त्याने दिली आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...