आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक कर्जमाफीबाबत मिळेना बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांची माहिती अनेक बँकांकडून सहकार विभाग जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.
 
शेतकरी कर्जमाफी अंतर्गत जिल्हयातील सर्व पात्र शेतकऱ्यांची अद्यावत माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी. एकही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहता कामा नये. पिक कर्ज प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे उद्दिष्टही वेळेत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
 
लोकशाही सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे विभागीय मुख्य अधिकारी श्री कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक तुकाराम गायकवाड, जिल्हा उपनिबंधक गाेपाल मावळे आदींसह बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकरी कर्जमाफी हा महत्त्वाचा विषय असून याबाबत सर्व बँकांनी दक्षतेने कार्यवाही करावयाची आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, कर्जमाफी संदर्भात काढण्यात आलेल्या शासन निर्णयातील निकषांप्रमाणे बँकांनी वेळेत कार्यवाही करावी. अडचणी असल्यास त्या मांडाव्यात. या कामात हलगर्जीपणा करु नये. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देऊ नका. पात्र शेतकऱ्यांची अद्यावत माहिती १५ जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनाला कळवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
 
अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित
पिक कर्जसंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, पिककर्जासाठी जिल्ह्याला लाख १४ हजार शेतकऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अद्याप अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत ३१ जुलै पर्यंत उद्दिष्टांप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप करण्यात यावे. यात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
 
दर आठवड्याला अाढावा
प्रधानमंत्रीपिक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळण्यासाठी विमा कंपन्या बँकांनी प्रयत्न करावेत. यासाठी कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांची मदत घ्यावी. दर आठवड्याला या योजनेचा आढावा घेतला जाईल, असेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०१७-१८ बाबत कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी उपस्थित बँकांच्या प्रतिनिधींना सदर योजनेबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
बातम्या आणखी आहेत...