अकोला- नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यात एकीकडे अपयश आले असताना दुसरीकडे केवळ आश्वासनांची खैरात वाटण्यातच सत्ताधारी स्वत:ला धन्य मानत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनी केला.
भाजप-सेना युतीला सत्तेत येऊन ३०० दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. सत्ता हाती घेतल्यानंतर आता शहराला ‘अच्छे दिन’ येतील, अशा बोंबा सत्ताधाऱ्यांनी मारल्या. परंतु, प्रत्यक्षात एकही विकासकाम आतापर्यंत सत्ताधाऱ्यांना करता आलेले नाही. याउलट काँग्रेसच्या कार्यकाळात आलेला निधीही अद्याप खर्च करता आला नाही. एकीकडे २६ कोटी निधीतून कामे झालेली नसताना १५ कोटी रुपयांचा रस्ते दुरुस्ती निधीही अद्याप खर्च झाला नाही.
केवळ पॅचिंग करण्यातच सत्ताधारी स्वत:लाच धन्य मानत आहेत. दैनंदिन पाणीपुरवठा, साफसफाई, दिवाबत्ती, रस्ते दुरुस्ती, नाला सफाई आदी सर्वच कामे रेंगाळली आहेत. या सर्व प्रकारामुळे नागरिक वेठीस धरले जात आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी सातत्याने विकासकामे सुरू होतील, असे आश्वासन देत आहेत. सत्ताधारी गटातील अंतर्गत कलहामुळे तसेच टक्केवारीच्या गणितामुळे विकासकामांचे घोडे अडले आहे.
महापालिका क्षेत्रात सत्ताधारी गटाचेच आमदार असताना तसेच गल्ली ते दिल्ली सत्ता असताना विकासाचे सोयरसुतक नाही. नागरिक एकीकडे मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहत असताना सत्ताधारी गट ताजमहालचे स्वप्न अकोलेकरांना दाखवत आहे, असा आरोपही साजिदखान पठाण यांनी केला.