तेल्हारा - जुन्यापिढीतील शेतकरी कामगार पक्षाचे ध्येयवादी निष्ठावान कार्यकर्ता, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, कवी प्रभाकरराव विश्वनाथ सावरकर हे काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचे अल्पशा आजाराने अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मंगळवार, ऑक्टोबरला सकाळी १०.३० वाजता निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा आप्त परिवार आहे. उद्या, बुधवार, ऑक्टोबरला सकाळी १० वाजता कर्मभूमी बेलखेड येथे त्यांच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बेलखेड ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य, युवा पत्रकार सत्यशील सावरकर यांचे ते वडील होत. ते अकोट तालुक्यातील अंबोडाचे मुळचे रहिवासी होते. सन १९४२ ते ६० दरम्यान अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथे १८ वर्षे, लखापूर येथे सन १९६० ते ६४ चार वर्षे त्यांचे वास्तव्य होते. सन १९६४ ते ६६ नंतर ते तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे स्थायिक झाले. दरम्यान, त्यांनी अनेक पदे भूषवली. वृत्तपत्र क्षेत्रात लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय दिला. शासनाच्या सिलिंग जमिनी वाटप न्याय प्राधिकरण समिती, म. रा. मार्ग परिवहन समिती नागपूर आकाशवाणी सल्लागार समितीचे ते सदस्य होते. माजी मंत्री वसंतराव धोत्रे यांच्या “वासनवेल’ गौरव ग्रंथाचे, साप्ताहिक पूर्णाकाठचे संपादन त्यांनी केले. विविध दैनिके, साप्ताहिके, मासिकांमध्ये कथा, कविता यासह विविध विषयांवर लेखन केले. त्यांचा माणूस हा कविता संग्रह, गावगाडा एक वाडा, जनाई कादंबरी लेखन प्रसिद्ध आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे आजीवन सदस्य होते. विविध क्षेत्रातील मान्यवर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग, तत्कालीन उर्वरित.पान
मुख्यमंत्रीशरद पवार, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण यांच्या राज्यातील,जिल्ह्यातील मान्यवरांसाेबत त्यांचा निकटचा संबंध होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते भाई सावरकर यांचा शेकाप अधिवेशनात सत्कार केला होता.
आंबेडकर चळवळीचे पुरस्कर्ते माई आंबेडकर, अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे ते खास स्नेही होते, तर रा. सु. गवई यांच्याशी त्यांची शालेय मैत्री होती. डॉ. अण्णासाहेब कोरपे यांचे मानसपूत्र म्हणून विशेष प्रेम होते. त्यांना गो. रा. वैराळे, आबासाहेब खेडकर, शरद पवार, एन. डी. पाटील, मधुकरराव भुईभार यांचे त्यांना आशिर्वाद लाभले. अखिल भारतीय आर्य प्रतिनिधी सभा दिल्लीचे तत्कालीन प्रधान रामगोपाल शालवाले यांच्या विशेष उपस्थितीत बेलखेड येथे आयोजित सोहळ्यात शेकडो धर्मपरिवर्तीत आदिवासी बांधवांना समारंभपूर्वक वैदिक धर्माची दीक्षा सोहळ्याचे आयोजन त्यांच्याच मार्गदर्शनात झाले होते. सतत १३ वर्षे दसऱ्याच्या दिवशी बेलखेड येथे काढलेली सर्वधर्म एकता यात्रा अंकुर, प्रतिभा साहित्य संमेलन आयोजनात त्यांचे मोलाचे योगदान होते.
त्यांच्या निधनाची वार्ता कळताच खासदार संजय धोत्रे, शेतकरी नेते प्रकाश पोहरे, आमदार रणधीर सावरकर यांच्यासह अनेक पत्रकार, मान्यवरांनी त्यांचे अकोल्यात अंत्यदर्शन घेतले. त्यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी बेलखेड येथे अाणले. त्यानंतर ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील विविध पक्ष, सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी, अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.