आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने केला अनेकांचा पोपट, नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्याने जुने कार्यकर्ते नाराज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विधानसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाची हवा निर्माण झाली आहे. त्यामुळे साहाजिकच इच्छुकांची संख्याही भाजपमध्ये अधिक आहे. भाजपने इच्छुकांकडून अर्ज मागवले एवढेच नव्हे तर मुलाखती घेताना प्रत्येकाकडून साडेसात हजार रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात ज्या उमेदवारांनी मुलाखतीच दिल्या नाही, त्यांना उमेदवारी दिल्याने अनेक इच्छुकांचा पोपट झाला आहे. विशेष म्हणजे जे काल पक्षात आले त्यांना उमेदवारी दिल्याने पूर्वीपासून तयारीत होते, त्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. 

विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे भाजपने महापालिका निवडणुक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु युती करीत नसल्याचा बनाव निर्माण करण्यासाठी शिवसेने सोबत चर्चा केली जाईल, असे गाजरही दाखवण्यास भाजपचे पदाधिकारी विसरले नाहीत. भाजपने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले. एकुण ३२५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात १२० महिला आणि १५ अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळेच भाजप स्वबळावर निवडणुक लढवणार ही बाब स्पष्ट झाली होती. भाजप प्रत्यक्ष ८० जागा लढवणार नसल्याने आणि दुसरीकडे शेकडो इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उमेदवारांची निवड करताना दमछाक ही होणारच होती. त्यासाठीच भाजपने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसा पर्यंत उमेदवारांची यादी जाहिर केली नाही. त्याच बरोबर दुपारी दोन ते तीन च्या दरम्यान एबी फॉर्मचे वाटप केले. त्यामुळे बंडखोरीला काही प्रमाणात का लगाम बसला. 
 
मात्र तरीही अनेक इच्छुकांना आश्चर्याचा धक्का बसला त्याच बरोबर ज्या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना आर्श्चयाचा धक्का बसला. भाजपने विद्यमान महापौर उज्वला देशमुख, योगेश गोतमारे, कल्पना गावंडे, गोपी ठाकरे, नम्रता मोहोड या पाच जणांची उमेदवारी रद्द केली. महापौर उज्वला देशमुख यांचे पक्षासोबत सलोख्याचे संबंध नव्हते. त्याच प्रमाणे भाजप मधील गटबाजीही त्यांच्या उमेदवारीस कारणीभूत ठरली. तर योगेश गोतमारे यांची उमेदवारी तांत्रिक कारणामुळे रद्द झाल्याचे बोलले जाते. नम्रता मोहोड यांचे पती मनीष मोहोड यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे त्यांना उमेदवारी देणे साहाजिकच होते. तर कल्पना गावंडे यांचे पती अजय गावंडे यांनी विधान सभेत राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश केल्याचा फटका त्यांना बसला.
 
मात्र गोपी ठाकरे यांची उमेदवारी नाकारण्या मागे नेमके कारण कोणालाही उमगलेले नाही. २०१२ च्या निवडणुकीत ज्या बंडखोरांनी निवडणुक लढवली आणि जिंकुन आले. त्यात गोपी ठाकरे यांचा समावेश होता. बंडखोरांपैकी पाच जण निवडुन आले. विजय अग्रवाल, सुनिता अग्रवाल, संजय बडोणे, माधुरी बडोणे आणि गोपी ठाकरे. 
 
या पाच जणांपैकी विजय अग्रवाल, सुनिता अग्रवाल आणि संजय बडोणे, माधुरी बडोणे या दोन्ही दाम्पत्याला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळेच जर बंडखोर दाम्पत्याला उमेदवारी दिली जाऊ शकते तर एकट्या गोपी ठाकरे यांना का नाही? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे पक्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना मात्र पक्षाने थेट उमेदवारी दिली आहे. त्याच बरोबर निशिकांत बडगे, रमेश अलकरी यांच्या सारखे अनेक कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे काम करीत असताना त्यांनाही पक्षाने उमेदवारी नाकारल्याने काही प्रभागात सर्व सामान्य कार्यकर्ताही नाराज झालेला आहे. या सर्व प्रकारामुळे भाजपने या निवडणुकीत अनेकांचा पोपट केला असला तरी ग्राऊंड लेव्हलवर काम करणारे कार्यकर्ते मात्र नाराज झाले आहेत. मात्र तुर्तास भाजपची हवा असल्याने या नाराजांची कदर तरी कोण करणार? अशी चर्चाही भाजपमध्ये सुरु आहे. 

समर्थकांना आर्श्चयाचा धक्का बसला 
शेकडो इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उमेदवारांची निवड करताना दमछाक ही होणारच होती. त्यासाठीच भाजपने उमेदवारी अर्ज दाखलच्या अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवारांची यादी जाहिर केली नाही. दुपारी दोन ते तीन च्या दरम्यान एबी फॉर्मचे वाटप केले. त्यामुळे बंडखोरीला काही प्रमाणात का लगाम बसला. मात्र तरीही अनेक इच्छुकांना आश्चर्याचा धक्का बसला. ज्या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना आर्श्चयाचा धक्का बसला.
बातम्या आणखी आहेत...