आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्दवाढीची अधिसूचना निघेल पुढील आठवड्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - हद्दवाढीबाबतचे सर्व सोपस्कार जवळपास पूर्ण झाले आहेत. हद्दवाढीच्या अनुषंगाने येत्या आठवड्यात अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या एक महिन्याच्या दरम्यान हरकती, आक्षेप स्वीकारल्यानंतर कार्यवाही उरकून एप्रिलअखेरपर्यंत महापालिका क्षेत्रालगतच्या २४ गावांचा समावेश महापालिकेत होईल.

२००१ ला महापालिका अस्तित्वात आली. त्याच वेळी महापालिका क्षेत्रालगतच्या गावांचा महापालिकेत समावेश करण्याबाबत चर्चा झाली होती. परंतु, तत्कालीन शासनाने अकोला नगरपालिकेच्या क्षेत्रालाच केवळ महापालिकेचा दर्जा दिला. परिणामी, ऑक्टोबर २००१ ला अकोला शहर महापालिका अस्तित्वात आली. तेव्हापासून महापालिकेच्या हद्दवाढीबाबत मंत्रालयात पत्र व्यवहार सुरू आहे. तत्कालीन आयुक्त लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रशेखर रोकडे, डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या कार्यकाळात हद्दवाढीबाबत जोरदार प्रयत्न करण्यात आले. परंतु, हद्दवाढ झाली नाही. परंतु, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी हद्दवाढ प्रकरणात जातीने लक्ष दिले. त्याच बरोबर आयुक्त अजय लहाने यांनीही चिकाटीने हद्दवाढीबाबतचे सोपस्कार पूर्ण केले. त्यामुळे हद्दवाढीचा मार्ग मोकळा झाला होता. मार्चला मंत्रालयातून या अनुषंगानेच महापालिका प्रशासनाला हद्दवाढीबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी बोलावण्यात आले.
शासनाच्या आदेशानुसार दोन वृत्तपत्रांत हद्दवाढीबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. एक महिन्याच्या कालावधीत नागरिकांना हरकती, आक्षेप नोंदवावे लागणार आहेत. साधारणत: १५ मार्च ते १५ एप्रिल हा एक महिन्याचा कालावधी यासाठी राहू शकतो. त्यानंतर आलेल्या हरकती आणि आक्षेपांवर कार्यवाही करून साधारणपणे ३० एप्रिलपर्यंत हद्दवाढीस अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लवकरच अधिसूचना
हद्दवाढीला शासनाने मंजुरी दिली आहे. या अनुषंगानेच अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. पुढील आठवड्यात ही अधिसूचना प्रसिद्ध होईल. त्यानंतर सर्व एप्रिलअखेर अथवा मे महिन्यात या गावांचा समावेश महापालिका क्षेत्रात होईल. अजय लहाने, आयुक्तमनपा
२४ गावांनाही बससेवेचा लाभ
हद्दवाढीनंतर या वर्षी सुरू होणाऱ्या शहर बस वाहतुकीचा लाभ या २४ गावांना मिळणार आहे. त्याच बरोबर भौरद, उमरी या गावांच्या पाणीपुरवठा योजना हा भाग महापालिका क्षेत्रात आल्यानंतर सुरू केल्या जाणार आहेत.
बससेवा, पाणीपुरवठा सुविधा
जी २४ गावे महापालिका क्षेत्रात समाविष्ट केली जाणार आहेत, त्या गावांमधील नागरिकांवर कराचा बोजा वाढणार असला, तरी बससेवा, पाणीपुरवठा आदी विविध सुविधाही या भागाला उपलब्ध होणार आहे.