अकोला - रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास ओळखीच्या मित्रासोबत १६ वर्षाची मुलगी अकोटरोडने जात होती. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ताच्या नजरेत ते आल्याने त्यांनी त्या दोघांनाही पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी युवतीला सुधारगृहात पाठवले. तर युवकाची चौकशी करून घटनेची नोंद घेतली आहे.
मेळघाट येथील युवतीची ओळख काही दिवसांपूर्वी अकोट येथील एका युवकाशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात बोलणे सुरु झाले. दोघेही पूर्वी एकाच ठिकाणी कामाला असल्यामुळे त्यांच्यात मोबाइलवरून बोलणे सुरू होते. रविवारी युवतीच्या भावाने तिला मारहाण केल्याने ती रागाच्या भरात घरून निघाली आणि अकोल्यात रात्री वाजताच्या दरम्यान पोहचली. यावेळी तिने अकोट येथील मित्राला अकोल्याला बोलावून घेतले. हा युवक त्याच्या दोन मित्रासोबत अकोल्यात आला. रात्री १२ वाजताच्या सुमारास तो युवतीला अकोटरोडने पायदळ घेऊन जात असताना संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष पवन महल्ले आणि त्यांच्या मित्राच्या ते तिघे दृष्टीपथास आले. त्यांनी रात्र आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्या युवतीची युवकाची विचारपूस केली असता दोघे भिन्नधर्मीय असल्याने त्यांनी दोघांनाही अकोट फैल पोलिस ठाण्यात आणले. तर युवकाचे सोबती तेथून पसार झाले.
रात्रीच्या सुमारास युवक आणि युवती दिसून आले. दोघेही भिन्नधर्मीय असल्यामुळे कसून चौकशी केली. मात्र आक्षेपार्ह काहीच नाही. युवक आणि युवती एकाच ठिकाणी काम करीत असल्यामुळे त्यांच्यात ओळख असल्याचे तपासात समोर आले - अनिल ठाकरे, ठाणेदार अकोट फैल