आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर बोरगावमंजू बसस्थानक झळाळले, परिसराचीही सफाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू - येथील बसस्थानकात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य राहत असल्याने प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली होती. तसेच बसस्थानक परिसरात दारूड्यांसोबत चिडीमारांचेही प्रस्थ वाढले होते. परिणामी, महिला युवतींमध्ये दहशत निर्माण झाली होती. मात्र या प्रकाराकडे महामंडळ प्रशासनाचे दुर्लक्ष होत असे. त्यामुळे बसस्थानकावर अंधाराचे साम्राज्य, चिडीमारांमुळे सुरक्षा धोक्यात या शीर्षकाखाली दैनिक दिव्य मराठीने या समस्येला २५ सप्टेंबरच्या अंकात वाचा फोडली होती. या वृत्ताची दखल घेत येथील वाहतूक नियंत्रकांनी २६ सप्टेंबरला वरिष्ठांशी चर्चा करून बसस्थानकातील परिसरातील सर्व लाइट सुरू केले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी बसस्थानकात सर्व बस आल्याचे पाहावयास मिळाले.

येथील बसस्थानक समस्यांच्या विळख्यात अडकल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. बसस्थानक परिसरात सर्वत्र घाण पसरली होती. पाण्याचीही व्यवस्था नव्हती. तसेच स्वच्छतागृहांचीही दैनावस्था झाली होती. त्यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होत असे. यासंदर्भात दैनिक दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित करताच आगार प्रशासन खडबडून जागे झाले बसस्थानकातील लाइट सुरू करण्यासोबतच प्रवाशांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासोबतच बसस्थानकासह परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच स्वच्छतागृहाचीसुद्धा सफाई करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

वाहतूक नियंत्रक एस. टी. जुमळे यांनी सकाळीच रोडवर उभे राहून बसस्थानकाबाहेरच थांबून प्रवाशांना उतरून देऊन जणाऱ्या बसेस बसस्थानकात वळवल्या आहेत. दरम्यान, काही बसचालक अरेरावी करत बस बाहेरूनच घेऊन जातात. तसेच पासधारक विद्यार्थ्यांना चढण्यास मनाई करणाऱ्या बसच्या चालक वाहकांना समज देण्याची मागणी करण्यात येत आहे.

त्रासातून सुटका झाली
^बसस्थानकाची साफसफाई करण्यासोबत मागील अनेक दिवसांपासून बंद असलेले लाईट सुरू केल्यामुळे समाधान वाटत आहे. यामुळे प्रवाशांची त्रासातून सुटका झाली आहे.'' मनीषवाडेवाले, छावा संघटना अकोला.

धावत जाणे टळले
^बसस्थानकातील समस्येला वाचा फोडल्यामुळे सर्व लाइट सुरू झाले आहेत. तसेच बसेसही आता बसस्थानकात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांची बस पकडण्यासाठी होणारी फरपट थांबली.'' डॉ.भरतकुमार अजमेरा, पासधारक प्रवासी.

बसस्थानकातील लाइट सुरू केल्याने समाधान
^मागील काही दिवसांपासून बसस्थानकातील सर्व लाइट बंद होते. त्यामुळे चिडीमारीला ऊत आला होता. मात्र, आता सर्व लाइट सुरू झाल्याचे पाहून आनंद वाटत आहे.'' बजरंग अडचुले, नागरिक,