आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर बस वाहतुकीच्या सेवेमुळे मनपाला दोन कोटींचा फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सहकारी तत्त्वावर शहर बस वाहतूक सेवा सुरू करण्याचा बहुमान मिळवणाऱ्या महापालिकेला याच सेवेमुळे दोन कोटी रुपयांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही परिस्थितीत महापालिकेला या पैशांचा भरणा करावाच लागणार आहे. त्यामुळे बिकट आर्थिक परिस्थिती असताना हा पैशांचा भरणा कसा करावा, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
महापालिकेने सहकारी तत्त्वावर बस सेवा सुरू केल्याने या उपक्रमाचे राज्यभरात कौतुक झाले. राज्यातील अनेक महापालिकांनी सहकारी तत्त्वावर सेवा सुरू केली. या उपक्रमाला चांगला प्रतिसादही मिळाला. यानंतर बस वाहतूक संस्थेने पुन्हा नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी नागपूर सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन बस खरेदी करण्यात आल्या. या बसेस आयुक्तांच्या नावाने घेण्यात आल्या, तर कर्जाचा हप्ता भरण्याची जबाबदारी संस्थेवर होती. परंतु, ग्रामीण भागात बस सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने नवीन बसेसपैकी अनेक बसेस उभ्या राहिल्या. या बसमधील अनेक पार्ट््सही गहाळ झाले, तर कर्मचाऱ्यांनी वेतन थकल्याने संप पुकारला. या सर्व प्रकारामुळे बस वाहतूक सेवा डबघाईस आली आणि राज्यात आदर्श ठरलेली बस सेवा बंद पडली. बस सेवा बंद झाल्यामुळे बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडही थांबली. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आरटीओ आदी विविध विभागांची देयके थकली. नागपूर सहकारी बँकेने मूळ रकमेसह दीड कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस महापालिकेला बजावली आहे. हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्याने मनपा प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीत बँकेच्या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. बँकेसह दोन कोटी रुपयांचा भरणा मनपाला करावा लागणार आहे.

आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत
आयुक्त अजय लहाने रुजू होण्यापूर्वी शहर बस सेवा वाहतुकीसाठी निविदा बोलावल्या होत्या. परंतु, या निविदात कर्ज काढून बस खरेदी करताना गॅरंटी आयुक्तांना घेण्याचे नमूद केले होते. परंतु, यापूर्वीचा इतिहास लक्षात घेऊन आयुक्तांनी पुन्हा निविदा बोलावल्या त्यात बस खरेदीबाबत आयुक्त गॅरंटी घेणार नाहीत, असे नमूद केले. त्यांच्या निर्णयामुळे भविष्यात का होईना, अशा दुर्दैवी प्रकरणांचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले.