आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Candidates Online Application Fill Carefully In Akola

उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक भरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ऑनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे. अर्ज भरण्यासाठी, संग्राम कक्ष सेतू केंद्र संचालकांनी जास्त रक्कम घेऊन उमेदवारांची लूट करू नये. आवश्यक त्या मार्गदर्शनासाठी तहसील कार्यालयस्तरावर मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे उमेदवारांनी काळजी करण्याचे कारण नाही. कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होणार नाही. त्यादृष्टीने सेतू केंद्र संचालक, महाऑनलाइन, संग्राम कक्षाच्या डाटा एन्ट्री ऑपरेटरने अचूक फॉर्म भरावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले.

उमेदवारांना अर्ज भरण्याबाबत संभाव्य काही समस्या उद्भवू शकतील, या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी दरम्यान निवडणुकीच्या दृष्टीने सेतू केंद्र संचालक, इच्छुक उमेदवार संग्राम कक्षाच्या डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला तहसीलदार संतोष शिंदे, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम, नायब तहसीलदार पूजा माटोडे, नायब तहसीलदार आराधना निकम, सेतू केंद्राचे जिल्हा समन्वयक योगेश भाटी उपस्थित होते. या वेळी एसडीओ प्रा. खडसे यांनी सांगितले की, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रथमच ऑनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१५ दरम्यान मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने घोषित केला आहे. नामनिर्देशनपत्र त्यासोबत संभाव्य कागदपत्रे सादर करण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण आवश्यक आहे. उमेदवारांची सर्व माहिती व्यवस्थितरीत्या संकलित व्हावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महाऑनलाइनच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असली तरी अचूक माहिती भरल्याशिवाय अर्ज पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे अर्ज भरताना आवश्यक दस्तएेवज जवळ ठेवावा. जेणेकरून धावपळ थांबेल, असे आवाहनही त्यांनी केले.

तहसील कार्यालयात सहायता कक्ष
अकोला तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आराधना निकम यांच्या नियंत्रणात ग्रामपंचायत निवडणूक सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी उमेदवारांना अर्ज भरण्यासह इतर आवश्यक माहितीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. उमेदवारांना अडचण असल्यास त्यांनी ०७२४-२४३५०४७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार संतोष शिंदे यांनी केले आहे.