आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर खरेदी; व्यापारी, मध्यस्थांविरुद्ध गुन्हे, 14.50 लाखांच्या फसवणुकीचा व्यवहार आला समोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मोरझडी येथील शेतकऱ्यांची ३२० क्विंटल तूर जळगाव जामोद येथील व्यापाऱ्याने बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी केली. त्यांना पुढच्या तारखेचे धनादेश दिले. मात्र हे धनादेश व्यापाऱ्याच्या खात्यात पैसे नसल्याने वटलेच नाहीत.
 
अखेर तुरीचे १४ लाख ५० हजार रुपये व्यापारी देत नसल्याची खात्री झाल्यानंतर शेतकऱ्यांनी उरळ पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ दखल घेत व्यापारी मध्यस्थांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. पोलिसांनी एका व्यापाऱ्याला अटक केली. तर दुसरा रुग्णालयात भरती झाला अन् तिसऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत. खासगी व्यापाऱ्यांनी अशाप्रकारे तूर खरेदी करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती आहे. 
 
जळगाव जामोद येथील व्यापारी अब्दुल सादिक, परवेज देशमुख खामगाव येथील मुन्ना देशमुख हे स्कॉर्पिओ गाडीने मोरझडी येथे आले. तेथे तुरीची हमीभावापेक्षा चढ्या दराने खरेदी करणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. चार पैसे अधिक मिळतील या आशेने शेतकऱ्यांना त्यांना तूर विकली. नोटबंदीमुळे कॅश रक्कम देता येणार नाही, असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना जळगाव जामोद येथील बँकेचे धनादेश दिले. शेतकऱ्यांनी ते धनादेश बँकेत लावले असता व्यापाऱ्यांच्या खात्यात पैसेच नसल्याने धनादेश परत आले. त्यानंतर व्यापाऱ्यांना विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी उरळ पोलिस ठाण्याचे ठाणेदार सोमनाथ पवार यांच्याकडे तक्रार दिली. ठाणेदारांनी तत्काळ दखल घेत व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले मुख्य आरोपी अब्दुल सादीक याला अटक केली. तो सध्या पोलिस कोठडीत आहे.

आणखी ६६ शेतकऱ्यांची झाली फसवणूक : मोरझडीतसेच आजूबाजूच्या गावच्या अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. आणखी ६६ शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने फसवणुकीचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
व्यापाऱ्याविरुद्ध खामगाव, शेगावातही तक्रारी झाल्या दाखल 
शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी करून त्यांची फसवणूक केल्याचे प्रकार खामगाव, शेगाव तालुक्यात घडले आहेत. अनेक शेतकऱ्यांची फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. शेतकऱ्यांनी तक्रारीही संबंधित ठाण्यात आहेत. जर संबंधित ठाण्यात तक्रारी झाल्या असतील तर व्यापाऱ्यांवर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
 
पिडीत शेतकऱ्यांना दिलासा देणारच 
खामगाव येथील मुन्ना देशमुख याच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांनी अब्दुल सादिक याला तूर विकली. थेट शेतकऱ्यांच्या दारातून मोजमाप करून त्यांनी ट्रकमधून तूर नेली. पोलिसांनी हा ट्रक एक स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे. अब्दुल सादीक याने तूर खरेदी केल्याची कबुली दिली असली तरी तूर कुणाला कुठे विकली याबाबत तपास सुरु आहे. 
- सोमनाथ पवार, ठाणेदार, उरळ पोलिस ठाणे 
 
बातम्या आणखी आहेत...