आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांत एक लाखाने घटली जनावरांची संख्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- शेतीतयांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणातील वापर, कमी उत्पादनामुळे चाऱ्याचे वाढलेले भाव आदी कारणांमुळे पशुपालनाकडे बहुतांश शेतकऱ्यांसह पशुपालकांनी पाठ फिरवली आहे. यासह विविध कारणांमुळे जिल्ह्यात सन २००७ ते २०१२ या पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल एक लाख १३ हजारांनी जनावरांची संख्या घटली आहे. पशुसंवर्धन विभागाने केलेल्या पशुगणनेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. सन २०१७ मध्ये होणाऱ्या पशुगणनेतही संख्येत घट येणार असल्याची भिती व्यक्त होत आहे.

काही वर्षांपूर्वी शेतातील नांगरणी, पेरणी, वखरणी, डवरणी तसेच मळणीही बैलांच्या साहाय्याने करण्यात येत होती. त्यावेळी चारा मुबलक प्रमाणात असल्यामुळे जनावरांची संख्याही मोठ्या प्रमाणावर होती. गाव-खेड्यात गायी, म्हशी पाळल्या जात असल्याने दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादनही मोठे होते. मात्र, काही वर्षांपासून शेतीत मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाचा वापर होत असल्यामुळे बैलांसह गायी, म्हशी पाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी होत आहे. त्यातच दिवसेंदिवस चाऱ्याचे भाव वाढत असल्याने आणि गुरांच्या संगोपनासाठी स्वतंत्ररित्या मजुराची आवश्यकता भासत असल्याने शेतकऱ्यांसह पशुपालकांनी पशुपालनाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस जनावरांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. दर पाच वर्षांनी पशुसंवर्धन विभागाद्वारे जिल्ह्यात पशुगणना केली जाते.

सन २००७ मध्ये केलेल्या पशुगणनेत जिल्ह्यात ११ लाख २२ हजार ४४२ जनावरांची संख्या असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामध्ये गायी पाच लाख ४१ हजार २९७, तर एक लाख ५० हजार ६१७ म्हशींचा समावेश होता. सन २०१२ मध्ये केलेल्या पशुगणनेत जिल्ह्यात १० लाख १३ हजार ६८८ अशी जनावरांची संख्या होती. या आकडेवारीनुसार सन २००७ ते २०१२ या पाच वर्षांत तब्बल एक लाख आठ हजार ७५४ जनावरांची संख्या घटली असल्याचे समोर आहे आहे. दरम्यान, पुढील काळात सन २०१७ मध्ये पशुगणना करण्यात येणार आहे. त्यामध्ये जनावरांच्या संख्येत आणखी घट येणार असल्याची भिती पशुसंवर्धन विभागासह पशुपालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

२००७ मधील गुरांची संख्या
पशुसंवर्धनविभागाने सन २००७ मध्ये केलेल्या पशुगणनेत जिल्ह्यात ११ लाख २२ हजार ४४२ एवढी संख्या होती. त्यामध्ये गायी पाच लाख ४१ हजार २९७, म्हशी एक लाख ५० हजार ६१७, मेंढ्या एक लाख एक हजार ६०२ आणि तीन लाख २८ हजार शेळ्यांचा समावेश आहे.

सन २०१२ मधील जनावरांची संख्या
सन२०१२ मध्ये केलेल्या पशुगणनेत जिल्ह्यात जनावरांची संख्या १० लाख १३ हजार ६८८ एवढी होती. त्यामध्ये गायी चार लाख ७८ हजार २१६, म्हशी एक लाख ३८ हजार १८२, मेंढ्या एक लाख २९ हजार ८३९ आणि दोन लाख ६७ हजार ४५१ शेळ्यांचा समावेश आहे.

मेंढीपालनाकडे पशुपालकांचा वाढला कल
सन२००७ मध्ये केलेल्या पशुगणनेत जिल्ह्यात एक लाख एक हजार ६०२ अशी मेंढ्याची संख्या होती, तर सन २०१२ मध्ये केलेल्या पशुगणनेत एक लाख २९ हजार ८३९ अशी मेंढ्याची संख्या असल्याचे समोर आले आहे. ही अाकडेवारी पाहता जिल्ह्यात पाच वर्षांत २८ हजार २३७ अशी मेंढ्यांची संख्या वाढली आहे. या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर मेंढीपालनाकडे पशुपालकांचा जास्त कल दिसून येत आहे.

वाढती महागाई आणि चाराटंचाईमुळे जनावरांना पाळणे कठीण
दिवसेंदिवसवाढत जाणारी महागाई चाराटंचाईमुळे जनावरे पाळणे कठीण झाले आहे. त्यातच बारा महिने बैलांना पाळण्यापेक्षा एक-दोन दिवसात ट्रॅक्टरने शेतीची कामे होत आहेत. जनावरे पाळण्यासाठी स्वतंत्र मजूर लागत आहे. मजुरीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे जनावरे पाळणे शक्य होत नाही. विजयराजपूत, शेतकरी

जिल्ह्यातील प्रजननक्षम जनावरांची संख्या अशी
जिल्ह्यातएकूण दोन लाख ३२ हजार ६८४ प्रजननक्षम जनावरे आहेत. त्यामध्ये गायी एक लाख ४९ हजार २२६, तर ८३ हजार ४५८ म्हशींचा समावेश आहे.