आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट सिमकार्ड वापरणारे ३९ जण एटीसीच्या जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बोगस कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्याचे नावे सिमकार्ड घेऊन त्याचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या जिल्ह्यातील ३९ जणांविरुद्ध दहशतवादविरोधी कक्षाने कारवाई केली आहे, तर सिमकार्ड तपासणी मोहिमेतून १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात दहशतवादविरोधी कक्षाने बोगस सिमकार्ड वापरणाऱ्यांविरुद्ध शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच बोगस पासपोर्ट तयार करणाऱ्यांचासुद्धा शोध घेऊन कारवाई करण्यात आली आहे, असे १० गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आले आहे. ज्यामध्ये ३९ आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानचे विविध कलमान्वये भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ (१) (क) (ख) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. मोबाइल शॉपी, अॅक्टिव्हेशन अधिकारी यांच्या संगनमताने बोगस सिमकार्ड बनवण्यात आल्याचे उघड झाले आहे. बोगस नावाने सिमकार्ड घ्यायचे. त्याचा बेकायदेशीर वापर करायचा, असा प्रकार सर्रास सुरू आहे. बेकायदेशीर वापर केल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल होतात. त्यानंतर प्रकरण दहशतवादविरोधी कक्षाकडे जाते. ज्याचे नावाने सिमकार्ड आहे, त्यांच्यापर्यंत पोलिस पोहोचतात आणि आपण तर या सिमकार्डचा कधी वापरच केला नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिस बनवेगिरी करणाऱ्या आरोपींपर्यंत पोहोचतात. त्यात अॅक्टिव्हेशन अधिकाऱ्यांचा मोठा हात असल्याचे आजवरच्या कारवायांमध्ये उघड झाले आहे. बोगस सिमकार्ड घेऊन त्याचा दहशतवादी कारवायांमध्ये वापर केल्या जाऊ शकतो, यावरून दहशतवादविरोधी कक्षाकडून ही सिमकार्ड तपासणी मोहीम राबवल्या जात आहे.

काय करावे?
सिमकार्ड घेताना दोन फोटो दोन मतदान ओळखपत्रे किंवा आधारकार्डच्या झेरॉक्स प्रती देऊ नये. कारण एका प्रतीचा वापर आपणास सिमकार्ड देण्यासाठी दुसऱ्या प्रतीचा वापर पुन्हा दुसरे सिमकार्ड काढण्यासाठी होऊ शकतो, तर दुसरे म्हणजे आपले सिमकार्ड जर हरवले असेल, तर त्याची जवळच्या पोलिस ठाण्यात लगेच तक्रार करावी.

तपासणी सुरू
सिमकार्ड धारकांची तपासणी सुरू आहे. बोगस सिमकार्डधारक अर्थात दुसऱ्याचे नावाचे सिमकार्ड वापरत असल्याचे निष्पन्न झाल्यावर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल हाेतील. नितीन पाटील, सहा.पोलिस निरीक्षक, दहशतवादविरोधी कक्ष