आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी लावून देताे म्हणत अनेकांना लाखाेंचा गंडा; सुत्रधार अमरावती, यवतमाळचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- समाजकल्याण विभागात तीन लाख रुपयांत वरिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे सांगणाऱ्या रॅकेटचे बिंग फुटले. यातील एका सुत्रधाराला पोलिसांनी गुरुवारी रात्री १० वाजता पकडले. अनेक युवकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे.
 
नोकरी लावून देतो अशी फसवणूक करणाऱ्या टोळीचा म्होरक्या हा शिक्षक आहे. त्याने अकोल्यातील तीन युवकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. तर अमरावती, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक युवकांना बनावट ऑर्डर देऊन गंडवण्यात अाले अाहे. सचिन अरूण कुरई या सुशिक्षित बेरोजगार त्याच्या दोन मित्रांकडून प्रत्येकी दोन लाख रुपये मुख्य सुत्रधार पेशाने शिक्षक असलेल्या शुद्धोधन नरसोडी तायडे(रा. बोरीअरब, ता. दारव्हा जि. यवतमाळ) याने त्याचा पंटर सागर जनार्दन गोगटे (रा. गांधी चौक तोडजागीरवाडा, अमरावती) याच्या मार्फत घेतले. उर्वरित पैसे देताना सचिन त्याच्या मित्रांना संशय आल्याने त्यांनी २७ जून २०१७ रोजी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी शुद्धोधन तायडे याच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते.
 
या प्रकरणाचा तपास करताना जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अन्वर शेख यांनी पोलिस उपनिरीक्षक संतोष अघाव, सुवर्णा गोसावी यांचे पथक गठित करून सागर गोगटे याला अमरावतीहून अटक केली.
 
कित्येक युवकांना गंडवल्याचा संशय
शुद्धोधन तायडे याने कितीतरी युवकांना नोकरीच्या बनावट ऑर्डर देऊन गंडवले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी बनावट शिक्के, लेटरपॅड, समाजकल्याण आयुक्तांच्या नावाच्या बनावट ऑर्डर ताब्यात घेतल्यानंतर किती युवकांना गंडवले हे समोर येणार आहे. तसेच किती रुपयांचा गंडा घातला, हेही लवकरच कळणार अाहे.
 
एप्रिल महिन्यात घेण्यात आली परीक्षा
एप्रिल महिन्यात समाजकल्याण विभागातील वरिष्ठ लिपिक पदासाठी जागा निघाल्या होत्या. यासाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांशी शुद्धोधन तायडे याने संपर्क साधने सुरु केले. ‘मी तुमच्या नोकरीसाठी वशिला लावतो’ म्हणत त्यासाठी त्याने प्रत्येक उमेदवारांकडून तीन लाख रुपये घेतले. पोस्टाद्वारे त्यांना बनावट ऑर्डरही पाठवल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
मुख्य सुत्रधार शिक्षक, देत हाेता बनावट ऑर्डर
शुद्धोधनतायडे हा दारव्हा तालुक्यातील तरनोडी येथे उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक होता. दरम्यान त्याने संस्थाध्यक्षाच्या नावाचे बनावट लेटरपॅड बनवले. तसेच शाळेच्या बनावट टीसीही तयार केल्या आहेत. महाराष्ट राज्य समाजकल्याण आयुक्तांच्या नावाने स्टॅम्प बनवले अाहे. बनावट नियुक्ती आदेश देऊन तो युवकांची फसवणूक करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
 
युवकांनी साधला होता एसपींशी संपर्क
सचिन कुरई याने सुरुवातीला दीड लाख रुपये दिले. उर्वरित दीड लाख रुपये देण्यासाठी सागर गोगटे याने त्याला फोन करून यवतमाळ येथील समाजकल्याण विभागात बोलावले. सचिन तेथे गेला असता सागर याने टोलवाटोलवी केल्याने आपली फसगत होत असल्याचा संशय सचिनला आला. त्याने उर्वरित पैसे देता जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या मार्गदर्शनात सिव्हिल लाइन्स पोलिस आरोपीपर्यंत पोहचले.
 
बातम्या आणखी आहेत...