आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाल कामगारांच्या मुक्तीची जबाबदारी प्रत्येक कार्यालयावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बालमजुरी हा कायद्याने गुन्हा असला, तरी अनेक छोटे-मोठे काम करताना लहान मुले आढळून येतात. अनेक शासकीय, खासगी कार्यालयांमध्ये चहा आणणारा हा ‘छोटू’च असतो, अशी विविध कामे करणाऱ्या या छोटूंची कामांमधून मुक्तता करण्याची जबाबदारी आता सर्व कार्यालयांची असणार आहे. जिल्हाधिकारी यांनी २० नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून, सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयांना निर्देशित करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार कोणत्याही कार्यालयात, परिसरात बाल कामगार आढळल्यास संबंधित कार्यालयाने बालकांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या यंत्रणांना सूचित करायचे आहे.

बाल कामगार (प्रतिबंध नियमन) अधिनियम १९८६ नुसार लहान बालकांना कामांवर ठेवणे किंवा त्यांच्याकडून काम करवून घेणे कायद्याने गुन्हा आहे. या कायद्यांतर्गत बालकांचे वय १४ वर्षे असे असले, तरी बाल न्याय (मुलांची काळजी संरक्षण) २००० सुधारित २००६ नुसार बालकांचे वय १८ वर्षे मानल्या गेले आहे. त्यानुसार १८ वर्षे वयोगटातील बालकांकडून काम करवून घेणे बाल न्यायनुसार प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. शहरातील अनेक शासकीय कार्यालयांच्या परिसरात बालके काम करताना पाहायला मिळतात. चहाचे कॅन्टीन असेल, छोटे हॉटेल यांसह विविध ठिकाणी लहान मुले काम करत आहेत. अनेक वेळा शासकीय कार्यालयांच्या परिसरात, विभागांमध्ये विविध छोटी-मोठी कामे करताना मुले पाहायला मिळतात, अशा बालकांना बालमजुरीपासून मुक्त करणे ही सर्वांची जबाबदारी असून, यावर संवेदनशीलतेने काम करून प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.

१४ ते २१ नोव्हेंबरदरम्यान देशभर बाल हक्क संरक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. यात बाल संरक्षण कक्षाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यातीलच एक सकारात्मक पाऊल उचलत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी प्रत्येक शासकीय, निमशासकीय खासगी कार्यालयांना परिपत्रक पाठवले असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

या परिपत्रकानुसार कोणत्याही शासकीय कार्यालयांमध्ये, तसेच कार्यालयांच्या परिसरात बालके काम करताना आढळली, तर या बालकांसाठी काम करणाऱ्या यंत्रणांना सूचना देण्यात यावी. बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड लाइन, पोलिस यंत्रणा यांना सूचना देऊन योग्य ती कारवाई करून त्या बालकाला बालमजुरी प्रथेतून मुक्ती करण्यासाठी सहकार्य करावे. शिवाय शासकीय कार्यालयांच्या परिसरात बालमजूर दिसल्यास संबंधित कार्यालयांवर कारवाई करण्यात येईल.

Á जिल्हाधिकारी कार्यालय
Á पोलिस अधीक्षक कार्यालय
Á मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
Á आयुक्त, महापालिका
Á अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
Á जिल्हा शल्यचिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय
Á शिक्षणाधिकारी, प्राथ. माध्य. विभाग
Á समाजकल्याण अधिकारी, विशेष समाजकल्याण विभाग
Á जिल्हा महिला बालविकास अधिकारी
Á अारोग्य अधिकारी, जिल्हा परिषद
Á प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभाग
Á सहायक कामगार आयुक्त
Á उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
Á वाहतूक नियंत्रक, राज्य परिवहन मंडळ
Á महाव्यवस्थापक, डीआयसी
Á कार्यकारी अभियंता, एमआयडीसी
Á अध्यक्ष, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स
Á मिटकॉन
Á अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

बंदीसाठी सहकार्य करावे
^समाजात विविध ठिकाणी अनेक कामे करताना लहान मुले दिसून येतात. अनेक वेळा आपल्या सभोवती ही मुले काम करतात. त्यांची बालमजुरीतून मुक्ती करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून, बालमजुरी प्रथा बंद करण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे.'' करुणा महंतारे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी.