पातूर - स्थानिक किड्स पॅराडाइज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सजावट साहित्याच्या विक्रीतून जमा झालेल्या रकमेतून एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शिवणयंत्र दिले. शाळेत १२ फेब्रुवारी रोजी आयोजित "फन डे २०१६' या कार्यक्रमात हे शिवणयंत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभात किड्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गजानन नारे यांनी केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी पत्रकार अॅड. सुधाकर खुमकर होते. तहसीलदार राजेश वझिरे, किड्स पॅराडाइजचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका ज्योत्स्ना गाडगे, पंचायत समिती सदस्य संदीप इंगळे, वावगे, पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग फाडे, गौरव सपकाळ, संजय गाडगे, संदीप शेवलकार, अनिताताई तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी या वेळी विचार व्यक्त केले. या वेळी स्केटिंग शो, जिम्नॅस्टिक, मार्शल आर्ट आदी क्रीडा प्रात्यक्षिके झाली. विद्यार्थ्यांनी नृत्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या वेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील अनिताताई तायडे यांना मान्यवरांच्या हस्ते शिवणयंत्र देण्यात आले. सूत्रसंचालन कीर्ती पाटील, सुषमा इनामदार सविता गिराम यांनी केले. राधा इनामदार, शीतल जुमळे, अनिता गंगतीरे, सुलभा तायडे, अनंता थोराईत, नितीन भरणे, चंद्रमणी धाडसे, दीपा वानखडे, भाग्यश्री तुपवाडे, मोहम्मद जमील, वृंदा अंधारे, मंदाताई तायडे आदींनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
प्रथमेशने वाढदिवसाचे पैसे दिले कुटुंबाला
किड्स पॅराडाइजमधील इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी प्रथमेश तांदळे याने स्वत:चा वाढदिवस साजरा करता त्यासाठीच्या खर्चाची रक्कम या वेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिली. शाळेमध्ये सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाद्वारे बँकेत जमा केलेल्या रकमेतून त्यांनी ही मदत दिली.