आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात ‘त्या’ तीन युवकांनी ओतून घेतले अंगावर रॉकेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मान्सून पूर्वनाला सफाईचे काम पूर्ण केल्या नंतर दोन महिने उलटूनही मजुरी मिळाल्याने त्रस्त झालेल्या तीन युवकांनी अखेर शनिवारी १५ जुलैला मनपा कार्यालय परिसरात अंगावर रॉकेल ओतून घेतले. दरम्यान पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या तीन युवकांना ताब्यात घेतले. ‘दिव्य मराठी’ने १३ जुलैच्या अंकात या मजुरांची मजुरी रोखून धरल्याचे वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष. 
 
दरवर्षी मान्सूनपूर्व नाला सफाईचे काम केले जाते. यासाठी निविदा बोलावल्या जातात. यावर्षी निविदा प्रसिद्ध केल्या मात्र या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मनपाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मार्फतच झोन निहाय नाला सफाई करण्याचे निश्चित केले. या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मनपाकडून अग्रीम रक्कम दिली. या रकमेतून अधिकाऱ्यांनी नाला सफाईचे काम सुरु केले. चारही झोन मध्ये नाला सफाईचे काम केले. काही झोन मध्ये दहा लाखांपेक्षा अधिक तर काही झोन मध्ये १५ लाखांपेक्षा अधिक खर्च झाला. उत्तर झोन मधील नाला सफाईचे काम करताना क्षेत्रीय अधिकारी जी.एम.पांडे यांना आठ लाख अग्रीम रक्कम दिली. मात्र झोन मधील नाल्यांची सफाई झाल्याने पून्हा सात लाख खर्च करावा लागला. रक्कम नसताना काम झाल्या नंतर या कामाचे देयक दिले जाईल, या विश्वासावर जी.एम. पांडे यांनी जुने शहरात राहणारे अमोल गवई, राजन तांबोळी, राजगुरु जाधव या तीन युवकांकडून नाला सफाईसाठी मजुर बोलावले. बिल मिळाले की तुमचे पैसे दिले जातील, असे आश्वासन दिले. या युवकांनी व्याजाने पैसे घेऊन मजुरांना मजुरी दिली. परंतु दोन महिने उलटूनही पैसे मिळाल्याने या तिन्ही युवकांनी जी.एम.पांडे यांच्याकडे पैशाचा तगादा लावला होता. दरम्यान प्रशासनाने झालेल्या कामांच्या चौकशीचा निर्णय घेतल्याने देयक रखडले. दहा जुलैला या युवकांनी पुन्हा जी.एम.पांडे यांची भेट घेऊन मजुरी देण्याची विनंती केली. मजुरी मिळाल्यास अंगावर रॉकेल घेण्याचा तोंडी इशारा दिला. या प्रकारामुळे क्षेत्रीय अधिकारी जी.एम.पांडे अडचणीत आले आहेत. अखेर त्रस्त झालेल्या या युवकांनी मनपा कार्यालयात येऊन अंगावर रॉकेल ओतून घेतले. यामुळे 
खळबळ उडाली. दरम्यान पोलिस घटनास्थळी पोचले, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या तिन्ही युवकांना ताब्यात घेतले. 

अकस्मात आले अन अंगावर रॉकेल घेतले :या तिन्ही युवकांचा त्यांच्या मजुरीशी मनपाशी संबंध नव्हता. या युवकांनी लेखी इशाराही दिला नव्हता. त्यामुळे तीन युवक येतील आणि अंगावर रॉकेल घेतील, असे कुणालाही वाटले नाही. या तिन्ही युवकांनी साडेअकरा वाजता महापालिका गाठली. आयुक्तांच्या दालनासमोर अंगावर रॉकेल घेतले. या दरम्यान आयुक्त कार्यालयात नव्हते, त्या नंतर या तिन्ही युवकांनी महापौरांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र महापौरही कार्यालयात नव्हते. या दरम्यान पोलिस आले, आणि त्यांनी या तिन्ही युवकांना ताब्यात घेतले. 
दोषकुणाचा? :या तिन्ही युवकांचा थेट मनपाशी संबंध नाही. मात्र मनपा अधिकाऱ्याच्या सांगण्यावरूनच या युवकांनी कामही केल, मजुरही पुरवले. काम मनपाचेच केले. तर दुसरीकडे जी.एम.पांडे यांनी उधारीत काम करताना किती लाखाचे काम करावे? याचे भान ठेवणेही गरजेचे होते. त्यामुळे या प्रकरणात दोष कुणाचा? असा पेच निर्माण झाला असला तरी प्रशासन, जी.एम.पांडे हे या प्रकरणास जबाबदार असल्याची चर्चा या निमित्ताने सुरु आहे. 
बातम्या आणखी आहेत...