आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्रीमध्ये गावठी दारू विक्रीला आला ऊत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उरळ - अंत्री येथे पोलिसांच्या आशीर्वादाने मागील अनेक दिवसांपासून गावठी दारू विक्रीला ऊत आला आहे. त्यामुळे आजूबाजूंच्या गावातीलही तळीराम अंत्रीकडे धाव घेत आहेत. मुबलक प्रमाणात कमी पैशात दारू मिळत असल्याने अल्पवयीन मुलेसुद्धा या व्यसनाच्या आहारी गेले असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे येथील महिला त्रस्त झाल्या असून, दारू विक्री बंद करण्याची मागणी होत आहे.
उरळ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अंत्री या गावात जवळपास १५ ते २० ठिकाणी गावठी दारूची विक्री करण्यात येते. गावठी दारूचे अड्डे नदीकाठी काही शेतांमध्ये असल्याची माहिती आहे. दारू विक्रेते काढलेली दारू गावात घेऊन येतात विक्री करतात. हलक्या दर्जाची दारू १० रुपये प्रती ग्लास, मध्यम स्वरूपाची २० रुपये, तर पहिल्या धारेची दारू ४० रुपये प्रती ग्लास याप्रमाणे विक्री करण्यात येते. या दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा वचक नसल्याने ते मिळेल त्या ठिकाणी बसून दारू विक्री करतात. अल्पवयीन मुलेसुद्धा दारूच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. दारुड्यांमुळे गावातील शांतता धोक्यात आली असून, भांडणतंट्यातही वाढ झाली आहे. तसेच घराघरांमध्ये वाद होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.
नागरिकांनी दारू अड्ड्यांची माहिती द्यावी
गावामध्येकुठे दारू काढण्यात येते तसेच ही दारू कुठे विक्री होते याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून दारू तसेच कुठलेही अवैध धंदे खपवून घेणार नाही. ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री होत नाही.'' -पी. के. काटकर, ठाणेदार, उरळ पोलिस ठाणे.
रसायनांचा वापर
गावठीदारूमध्ये रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असल्याने ते आरोग्यासही धोकादायक ठरत असून, एखाद्याचा जीव गेल्यानंतरच पोलिस कारवाई करणार आहेत का, असा सवालही उपस्थित होत आहे. मुंबईमध्ये गावठी दारूमुळे शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच उरळ पोलिसांकडून अंत्री येथील गावठी दारूकडे होणारे दुर्लक्ष चिंताजनक ठरत आहे.
अनेक कुटुंब संकटात
गावातगावठी दारू विक्रीला ऊत आला असून, या दारूमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे दारू पिणाऱ्यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.'' भारत वानखडे, सामाजिक कार्यकर्ता.
पोलिसांनी लक्ष द्यावे
गावठीदारू मिळत असल्याने पिणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे घराघरांत भांडणतंटे वाढत आहेत. पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची आवश्यकत आहे. श्रावण गुरव, पोलिस पाटील