आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजमध्ये "स्मार्टफोन'वर घाला बंदी, विद्यार्थ्यांकडून होतोय गैरवापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शाळा,महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन वापरावर बंदी घालण्यात यावी, विद्यार्थ्यांचे भवितव्य तसेच सामाजिकदृष्ट्याही हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. वेळीच बंदी घातली गेली नाही तर त्याचे गंभीर परिणाम येत्या काही वर्षांत आपल्यासमोर येतील, अशी भीती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात २२ सप्टेंबर रोजी त्यांनी राज्यपाल आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन पाठवले आहे.

डॉ. खडक्कार यांचे म्हणणे असे की, अन्य तंत्रज्ञानाप्रमाणे सोशल मीडियाचेदेखील फायदे, तोटे दिसू लागले आहेत. काही शाळा महाविद्यालयांत तर तंत्रज्ञानाचा वापर शिकवण्यासाठी होतो आहे. असे असले तरी त्याची दुसरी बाजू तितकीशी चांगली नाही. त्याचा दुरुपयोग युवा पिढीसाठी घातक ठरतो आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सचा अतिवापर पोषक नाही, असे आपले स्पष्ट मत आहे.
शाळा, महाविद्यालयांमध्ये स्मार्टफोन वापराने विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे.
व्हॉटस्अॅप, फेसबुकवर भारतीय व्यक्ती सध्या दिवसातील तास १८ मिनिटे खर्ची घालतात, तर प्रगत देशांमध्ये हे प्रमाण तास १२ मिनिटे इतके आहे. विद्यार्थ्यांकडून स्मार्टफोनचा दुरुपयोग सुरू आहे, काही प्रसंगी शिक्षकांना चुकीचे संदेश पाठवण्यासाठी देखील त्याचा दुरुपयोग होत आहे. काही ब्लॉग तर अफवा पसरवणारे ठरत आहेत. समाजाला त्याची फळे भाेगावी लागत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तासन््तास सोशल मीडियावर राहून हाती काहीच लागत नाही. नुसताच टाइमपास होतो. वेळेचा असा अपव्यय फायद्याचा आहे काय, याचाही विचार करण्याची गरज आहे.

आरोग्याच्यादृष्टीनेही तासनतास सर्फिंग करणे घातक ठरते आहे. स्मार्टफाेनचे युवा पिढीला जणू व्यसन जडले आहे. बंगळुरू, कोलकाता शहरांमध्ये याबाबतची समुपदेशन केंद्रदेखील कार्यान्वित झालेली आहेत. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्रात शैक्षणिक संस्थांमध्ये स्मार्टफोन वापराविषयी धोरण ठरवावे, अशी मागणीदेखील डॉ. खडक्कार यांनी राज्यपालांकडे केली आहे.