आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात दोन केंद्रांवर सुरू झाली कॉम्प्युटर टायपिंगची परीक्षा, अनेक दिवसांपासून रखडलेल्या अाॅनलाइन परीक्षेला मुहूर्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यात अकोला अकोट अशा दोन केंद्रांवर आज, रविवारपासून कॉम्प्युटर टायपिंगची परीक्षा सुरू झाली. गेल्या अनेक दिवसांपासून ही परीक्षा रखडली होती. राज्यभरात पहिल्यांदाच अशी परीक्षा घेतली जात असल्याने गेल्या वेळी त्यात बराच गोंधळ उडाला होता. त्यामुळे ती थांबवण्यात आली होती. ‘दिव्य मराठी’ने हा विषय लावून धरला होता.
परंपरागत टंकलेखन हद्दपार करण्याचा निर्णय घेत असतानाच शासनाने कॉम्प्युटर टायपिंग हा नवा पर्याय दिला होता. मात्र, त्यासाठीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने टायपिंग इन्स्टिट्यूटच्या संचालकांच्या संघटनेने राज्य शासनाशी पत्रव्यवहार केला होता. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, संगणक संस्थांची निश्चिती, प्रशिक्षक-परीक्षक आदी बाबी आधी निश्चित करा आणि त्यानंतरच परीक्षेचा कार्यक्रम घोषित करा, असे या संघटनेचे म्हणणे होते. त्यामुळे शासनाने अखेर कॉम्प्युटर टायपिंगचा अभ्यासक्रम पुढे ढकलत परंपरागत टायपिंगला काही काळापुरते अभय दिले होते. रविवारपासून या परीक्षेला प्रारंभ झाला. अकोल्यात तापडियानगरस्थित भारत विद्यालयात, तर अकोट येथे भाऊसाहेब पोटे कनिष्ठ महाविद्यालयात ही परीक्षा सुरू झाली. या दोन्ही केंद्रांवर पाच दिवस ही ऑनलाइन परीक्षा सुरू राहणार आहे. तीस शब्द प्रतिमिनिट या वेगाची ही परीक्षा मराठी, हिंदी इंग्रजी अशा तिन्ही भाषांमधून देण्याची सोय उपलब्ध आहे. दरम्यान, आजचा पहिला दिवस विनाअडथळा पार पडल्याचे केंद्रप्रमुख आश्विन मानकर यांच्या वतीने अकोला जिल्हा टंकलेखन लघुलेखन संस्थांच्या संघटनेचे कोषाध्यक्ष तथा या परीक्षेचे समन्वयक विलास दुधांडे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. संगणक तज्ज्ञ विजय जकाते, पर्यवेक्षक किशोर ढोरे, विकास तिरपुडे, सुप्रिया यानपेलवार यांनी केंद्रप्रमुखांना मदत केली.
दीडशे विद्यार्थी, तीन बॅचेस
या परीक्षेसाठी दीडशे विद्यार्थी आहेत. त्यामध्ये सर्वाधिक इंग्रजीचे ११४ असून, मराठीचे ३२ हिंदीच्या चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्वांना सकाळी ते साडेदहा, दुपारी १२ ते दीड अडीच ते चार, अशा तीन बॅचेसमध्ये ही परीक्षा द्यावयाची आहे. प्रत्येक बॅचला १५ विद्यार्थी आहेत.