आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेत काँग्रेस ‘एकला चलो रे’च्या मानसिकतेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - यापूर्वी महापौरपदाच्या निवडणुकीत तर आता स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सोडलेली साथ काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे दहा महिन्यांनंतरच्या महापालिका निवडणुकीत पक्षाने ‘एकला चलो रे’ची भूमिका घ्यावी, अशी अाग्रही मागणी काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. त्यामुळे काही दिवसांत राजकीय फेरबदलाची चिन्हे निर्माण झाली आहेत.

२०१२ च्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी १८ नगरसेवक निवडून आले. परंतु, काँग्रेसने पुढाकार घेत, सत्ता हातात घेतली. महापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यावर महापालिकेतील चित्र बदलले. भाजपपासून दूर गेलेले नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये परतले. तसेच महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसची साथ सोडत भाजपकडून मतदान केले. तेव्हापासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे. ती शांत होत असतानाच पुन्हा स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले. तसेच राष्ट्रवादीचा एकमेव सदस्यही अनुपस्थित राहिला. याचा फायदा भाजपचे सभापतिपदाचे उमेदवार विजय अग्रवाल यांना मिळाला. विशेष म्हणजे काँग्रेसने सत्ताधारी गटातील दोन सदस्यांना फोडण्याची तयारी पूर्ण केली होती. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अनुपस्थित राहिल्याने काँग्रेसला सभापतिपदावर पाणी सोडावे लागले. विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अजय तापडिया यांनाही त्यांचा सदस्य अनुपस्थित राहिल्याबद्दल नाराजीचे पत्र पाठवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असहकार्याचे धोरण राबवणार असेल तर मनपा निवडणुकीत युती का करावी? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक फायदा मिळतो. २००२ मध्ये राष्ट्रवादीचे केवळ तीन नगरसेवक निवडून आले होते, तर २००७ च्या निवडणुकीत आघाडी झाल्याने ११ नगरसेवक निवडून आले. २०१२ च्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नगरसेवक आघाडी झाल्यामुळेच निवडून आल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस सतत विरोधी पक्षाला सहकार्य करणार असेल तर निवडणुकीत आता आघाडी नको. एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यायचे असतील तर काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी मागणी श्रेष्ठींकडे केली आहे.
एकीकडे काँग्रेसने स्वबळावर लढण्याची मानसिकता तयार केली असली तरी दुसरीकडे काँग्रेसचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. निवडणुकीस अद्याप दहा महिने असल्याने आत्ताच राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास नगरसेवकपद जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्त हा प्रवेश थांबला आहे. परंतु, निवडणुकीच्या तोंडावर हा बदल होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पक्षश्रेष्ठींना माहिती पोहोचवणार
स्थायीसमितीसभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य गैरहजर राहिल्याचे पत्र विरोधी पक्षनेत्यांनी दिले आहे. मी बाहेरगावी असल्याने मला अद्याप हे पत्र वाचता आले नाही. परंतु, निवडणुकीत जे काही घडले, त्याची सर्व माहिती पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली जाईल. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी केली जाईल. अजय तापडिया, महानगराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस
बातम्या आणखी आहेत...