आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीचा धक्का लागल्याने अकोटमध्ये झाली दगडफेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - शहरातर विवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या दगडफेकीत एक जण जखमी झाला. यादरम्यान दुचाकीची मोडतोड करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनीही शहरात दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी केली. शहरात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे.
शहरातील नवनिर्माण चौकातून सायंकाळी साडेसहा वाजतादरम्यान सै. समीर सै. मुसा (वय २२, रा. पटवापुरा, अकोट) हा भाजीपाला विकून घरी जात होता. यादरम्यान दुचाकीवरून (क्रमांक : एमएच ३०-एएस ३४५७) तिघेजण जात होते. त्यांच्या दुचाकीचा सै. समीर सै. मुसा याला धक्का लागल्याने त्यांच्यात वाद झाला. या वेळी दुचाकीस्वारांनी सै. समीर याच्या डोक्यात वीट मारून जखमी केले. जखमी अवस्थेत तो घराकडे जात असताना त्याला रक्ताने माखलेल्या स्थितीत पाहताच नागरिकांनी दुचाकीवर दगडफेक करून तोडफोड केली. या दगडफेकीत एक जण जखमी झाला.

व्यावसायिकांनी आपापली दुकाने तातडीने बंद केली. काही वेळातच शहरात तणाव निर्माण झाला. दगडफेकीची माहिती मिळताच चौकीवर तैनात असलेले पोलिस काॅन्स्टेबल सूरज चिंचोळकर दिलीप इंगोले यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जमावावर लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मनवरे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अकोट उपविभागातील पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनाही त्वरित पाचारण केले.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी शहरात दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी केली. परिविक्षाधीन पोलिस अधिकारी सचिन सांगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मनवरे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अकोटचे ठाणेदार कैलास नागरे रजेवर असल्याने त्यांचा प्रभार पोलिस उपनिरीक्षक अशोक सूर्यवंशी यांच्याकडे आहे. तेसुद्धा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, अकोला येथील क्यूआरटीच्या जवानांनी शहरात पथसंचलन केले आहे.

भाजीपाल्याच्या दुकानात झाला होता वाद : घटनेचाकेंद्रबिंदू नवनिर्माण चौक असला तरी घटनेपूर्वी भाजीपाल्याच्या दुकानात वाद झाल्याचे कारण यामागे असल्याचे सांगितले जात आहे. या वादानंतर दुचाकीचा धक्का लागल्याचा प्रकार घडून दगडफेकीची घटना घडली. या प्रकरणात तक्रार दाखल केली असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

यापूर्वीही घडली होती घटना
यापूर्वीही नवनिर्माण चौकातूनच दंगलीला सुरुवात झाली होती. रविवारीही याच चौकात वाद होऊन दगडफेकीची घटना घडली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
पाेलिस अधीक्षक मीणा यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
बातम्या आणखी आहेत...