आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे द्या अन् घरपाेच मिळवा विविध क्रीडा प्रमाणपत्र, क्रीडा संघटना उकळताहेत पैसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव- पैसे द्या अन् घरपाेच पाल्यांसाठी प्रमाणपत्र मिळवा, असा गोरखधंदा जिल्ह्यातील काही शैक्षणिक संस्थांच्या शाळा क्रीडा संघटनांनी सुरू केला आहे. खेळाचे २५ गुण मिळाल्यास आपल्या मुलाची थेट टॉपमध्ये गणना होईल, या आशेने पालकही पैसे देऊन खेळाचे प्रमाणपत्र मिळवत आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे.

शासनाने नुकताच दहावी बारावीच्या परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. त्यामध्ये १५ ते २५ पर्यंत क्रीडा गुण देण्यात येणार आहेत. हीच संधी साधून जिल्ह्यातील काही मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनद्वारे क्रीडा प्रमाणपत्रासाठी पैशांची मागणी होत आहे. तुम्ही पैसे लवकर आणून जमा करा, खेळाच्या प्रमाणपत्रासाठी पुढचे आम्ही पाहतो, असा सल्ला पालकांना देण्यात येत आहे. शैक्षणिक संस्थांच्या या नव्या व्यवसायाने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पाल्याला वाढीव गुण मिळत असल्याने पालकही पैसे देऊन क्रीडा प्रमाणपत्र खरेदी करत आहेत. तसेच वेगवेगळ्या क्रीडा संघटनांकडूनही पैसे घेऊन विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेत सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र घरपाचे दिले जात आहे. मागील काही वर्षांपासून हा गोरखंधदा सुरू आहे. आतापर्यंत खेळांशी सबंध नसलेल्या अनेकांनी क्रीडा प्रमाणपत्र मिळवून खऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी केल्यास भ्रष्टाचाराचे मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी खेळामध्ये कागदोपत्री सहभागी हाेऊन क्रीडा गुण मिळवले असून, त्यांची टक्केवारी ९८ ते ९९ पर्यंत पोहोचली आहे. या विद्यार्थ्यांनी क्रीडा गुणाच्या आधारे चांगल्या संस्थेत प्रवेश मिळवला आहे. जिल्हा स्तरावरील प्रमाणपत्र देण्यासाठी १० ते १५ हजार, तर राज्यस्तरावरील प्रमाणपत्रासाठी तब्बल १५ ते २० हजार रुपयांची मागणी करण्यात येत आहे. पालकही पाल्यांना अतिरिक्त गुण मिळत असल्याने हे प्रमाणपत्र घेत आहेत. या क्रीडा प्रमाणपत्राची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

शालेय खेळाडूंना असे मिळतात क्रीडा गुण :
क्रीडाविभागामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना १५ गुण, राज्यस्तरीय स्पर्धेत प्रावीण्यप्राप्त खेळाडूला २० गुण, तर राष्ट्रीय स्पर्धेत प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना वाढीव २५ गुण देण्यात येतात. संघटना किंवा असोसिएशनच्या वतीने खेळणाऱ्या खेळाडूंनासुद्धा याच धर्तीवर गुण दिले जातात.

क्रीडा संघटनांच्या प्रमाणपत्राशी संबंध नाही
क्रीडासंघटनाशालेय स्पर्धा घेतात. या शालेय स्पर्धेतील खेळाडूंना प्रमाणपत्र देतात. सदर प्रमाणपत्र पुणे येथे तपासणीला जाते. त्यानंतर प्रमाणपत्र घेणारा खेळाडू योग्य की अयोग्य ते ठरवण्यात येते. बोगस खेळाडू असेल, तर तो अपात्र ठरून त्याचे प्रमाणपत्र रद्द हाेऊ शकते. मात्र, याच्याशी आमच्या कार्यालयाचा काही संबध नाही. गणेश जाधव, जिल्हाक्रीडा अधिकारी, बुलडाणा.

प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यानी लावला सपाटा
स्पर्धेतसहभागी झालेल्या विद्यार्थी खेळाडूंना अभ्यासासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने प्रोत्साहनपर गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कुठल्याही खेळांशी संबंध नसललेल्या आणि अभ्यासात असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी शॉर्टकट शोधत खेळाच्या संघटनांच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळवण्याचा सपाटा लावल्याचे दिसून येत आहे.
दहा ते वीस हजार रुपयांत मिळत आहेत प्रमाणपत्र

ज्या विद्यार्थ्यांचा खेळाशी काही संबंध नाही, अशा विद्यार्थ्यांना १० ते २० हजार रुपयांमध्ये क्रीडा प्रमाणपत्र देण्यात येत आहे. पालकही एवढे पैसे मोजून आपल्या पाल्यांसाठी क्रीडा प्रमाणपत्र घेत आहेत.