आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा भेदून तोतयाने दिला पोलिस भरतीचा लेखी पेपर? चार जण पोलिसांच्या ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पोलिस मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर चुकवत एका तोतया उमेदवाराने पोलिस भरतीचा लेखी पेपर देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या चार जणांना मंगळवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. उमेदवार हा औरंगाबाद येथील असून, त्याचा पेपर देणारा ताेतया हा मराठवाड्यातीलच असल्याची माहिती आहे.

कडेकोट बंदोबस्तात पोलिस भरतीची प्रक्रिया अकोला पोलिसांनी राबवली. मैदानावर लेखी परीक्षेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. प्रत्येक दिवशी अधिकाऱ्यांकडील जबाबदारीतही फेरबदल करण्यात येत होते. असे असताना पोलिस भरतीला नख लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबाद येथील उमेदवाराचा लेखी परीक्षेचा पेपर मराठवाड्यातीलच तोतया "विठ्ठला'ने सोडवल्याची माहिती आहे. या "विठ्ठला'ने चक्क पोलिस अधिकाऱ्यांची नजर चुकवत लेखी परीक्षा देण्यासाठी सुरक्षा यंत्रणा भेदून प्रवेश केला प्रशासनाच्या नाकावर टिच्चून परीक्षाही दिली. त्यात उमेदवार चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. त्यानंतर भरती प्रक्रियेत पाणी मुरल्याची कुणकुण पोलिस प्रशासनाला लागली. लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचीप्रक्रिया सुरू झाली. त्यात तोतया उमेदवाराने परीक्षा दिल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी उमेदवाराला आणि त्याच्या जागेवर लेखी परीक्षा देणाऱ्या ताेतया "विठ्ठला'ला मंगळवारी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस चार जणांची चौकशी करत आहेत. घोळातील नेमके सत्य लवकरच समोर येणार आहे.

चौकशी सुरू आहे
पोलिसभरतीचीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सीसीटीव्ही कागदपत्रांची तपासणी केली. आम्हाला त्यात संशय आला. त्यावरून चौकशी सुरू केली आहे. परिक्षेत गैरप्रकार झाल्याचे सध्या म्हणता येणार नाही, चौकशी अंतीच नेमके काय ते पुढे येईल. चंद्र किशोर मीणा, जिल्हापोलिस अधीक्षक
लाखो रुपयांचा झाला व्यवहार
लेखी परीक्षा देण्यासाठी लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. परीक्षेत गैरप्रकार करणारा उमेदवार औरंगाबाद येथील आहे. मराठवाड्यातीलच तोतयाची मदत त्याने लेखी परीक्षेसाठी घेतली. पोलिस या सर्व व्यवहारांची गैरप्रकाराची चौकशी करत आहेत.