आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयातून युवकाची केली निर्घृण हत्या, पोलिसांना माहिती देतो, म्हणून केला गेम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरिहरपेठमध्ये तगडा पाेलिस बंदाेबस्त ठेवण्यात अाला हाेता. - Divya Marathi
हरिहरपेठमध्ये तगडा पाेलिस बंदाेबस्त ठेवण्यात अाला हाेता.
अकोला- पोलिसांना आमच्या अवैध धंद्याची माहिती देतो, या कारणावरून युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना साेमवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान चाँद खाँ प्लॉटमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस रात्री उशिरापर्यंत आरोपींचा शोध घेत होते.

मो. आकीब मो. आरीफ (वय २२ रा. नवाबपुरा) असे मृतक युवकाचे नाव आहे. मो. आकीब हा वाशीम बायपास येथे मांस विक्रीच्या दुकानावर काम करतो. मो. आकीब आपल्या अवैध धंद्याची माहिती पोलिसांना देतो, म्हणूनच पोलिस आमच्यावर कारवाई करत आहेत, असा संशय आरोपींना आला. त्यावरून त्यांनी सोमवारी त्याला धडा शिकवण्याचे ठरवले होते. दुपारी वाजताच्या सुमारास नमाज पठणासाठी मो. आकीब दुकानातून घरी जाण्यासाठी निघाला.या वेळी रस्त्यात थांबलेल्या पाच ते सहा आरोपींनी त्याला अडवले. तू आमच्या धंद्याची माहिती पोलिसांना का देतो, म्हणून त्याच्याशी वाद घालून त्याच्यावर तलवार, चाकू आणि लोखंडी पाइपने हल्ला चढवला. त्यानंतर जीवाच्या आकांताने मो. आकीबने निसटण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर अचानक हल्ला चढवण्यात आला. या वेळी त्याच्या मांडीवर शस्त्राचा घाव खोलवर झाल्याने त्याची नस कापल्या गेली. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने तो कोसळला. या वेळी त्याला काही जणांनी दुचाकीवर बसवून जुने शहर पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी तत्काळ त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे दुपारी ४.४५ वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मो. अख्तर शेख मुस्ताक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख लखन, शेख कासम, शेख वसीम, शेख मजीद, शेख फिरोज, शेख हसन, शेख अय्याज उर्फ भोला यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत असून, एका जणाला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार रियाज शेख यांच्यासह शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे ठाणेदार घटनास्थळावर पोहोचले होते. त्यांनी जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळावर जाऊन पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी घटनेची माहिती घेत तपासाचे निर्देश दिले.

पोलिसबंदोबस्तामुळे अनर्थ टळला : मो.आकीब याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या नातेवाइकांसह समर्थकांनी सर्वोपचार रुग्णालयात गर्दी केली होती. मो. आकीबच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. त्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही युवक दुचाकीवरून चाँद खाँ प्लॉटमध्ये आरोपीच्या शोधात निघाले. मात्र, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावला होता. या वेळी ठाणेदार घनश्याम पाटील, खदानचे ठाणेदार सी. टी. इंगळे, कोतवालीचे अनिल जुमळे, एमआयडीसीचे शिरीष खंडारे, अनिल ठाकरे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

रविवारी रात्री केली होती ऑटोचालकला मारहाण : हरिहरपेठेतीलसितलामाता मंदिराजवळ ऑटोला अडवून काही जणांनी ऑटोचालकाशी वाद घातला आणि त्याला फायटरने मारून जखमी केले. या प्रकरणाची तक्रार जुने शहर पोलिस ठाण्यात रविवारी ऑटोचालकाने दिली. त्यावरून पोलिसांनी चार जणांवर गुन्हे दाखल केले होते. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिस गेले होते. मो. आकीब याने पोलिसांना आपली नावे सांगितल्याचा संशय आरोपींना आला. त्यामुळे त्यांच्या मनात असलेली खदखद हत्येच्या रूपात उफाळून आल्याची चर्चा परिसरात होती.

प्रेम प्रकरण, पैशाचा वाद की मुकबिरी
मो. आकीब मारेकऱ्यांच्या गटात पैशाचा वाद होता, अशी एक चर्चा घटनास्थळावर होती, तर प्रेम प्रकरणाचे कारणही हत्येमागे असल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांच्या रेकॉर्डवर पोलिसांचा मुकबीर असल्याच्या कारणावरून खून झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिस तिन्ही बाजूंनी घटनेचा तपास करत असून, आरोपींना पकडल्यानंतर त्यांच्याकडून काय माहिती समोर येते, हे पोलिस तपासातून समोर येणार आहे. त्यामुळे मो. आकीबच्या हत्येला या दोन्ही घटनेची किनार असल्याची चर्चा आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मो. आकीबचा फोटो...
बातम्या आणखी आहेत...