आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोट शहरात भरदिवसा ६ वर्षीय बालिकेचे अपहरण, पोलिसांनी केली सर्वत्र नाकाबंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- जिजामाता नगरातून मनश्री संतोष लाकडे या सहा वर्षीय चिमुकलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून एका अज्ञात महिलेने अपहरण केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांनी मनश्रीला शोधण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी केली असून, त्या परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत.

जिजामातानगरात राहणारी मनश्री लाकडे ही सहा वर्षीय बालिका दुपारी एक वाजताच्या सुमारास तिच्या घराबाहेर खेळत होती. एक अनोळखी महिला तेथे आली. तिने चॉकलेटचे आमिष दाखवून मनश्रीला पळवून नेले. घटना माहीत होताच मनश्रीच्या आईने आकांत केला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर शहर पोलिस ठाण्यात गर्दी केली. जिजामातानगरवासीय ठाण्यात घटना कळताच जिजामातानगरातील नागरिक पोलिस ठाण्यात गोळा झाले. पोलिसांनी मनश्रीला शोधण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी केली. दरम्यान, या घटनेमुळे शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अपहरणकरणारी टोळी सक्रिय : मनश्रीलाकडे हिची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती पाहता खंडणीसाठी अपहरण शक्य नाही. विविध कारणांनी मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली काय, याचा पोलिस तपास करत आहेत.

अपहरणाचादुर्दैवी इतिहास : अकोटतालुक्यातील आंबोडा येथील आणि तेल्हारा शहरातील दोन अबोध बालकांच्या अपहरणानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. या दोन्ही हत्या खंडणीसाठी ओळखीतील आरोपींनी हे अपहरण हत्याकांड केले होते. अशाचप्रकारे
तेल्हारा येथील विशाखा उर्फ लाडो बागाणी या चार वर्षीय बालिकेचे अपहरण केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी अक्षय पुरोहित याला जन्मठेप तर अक्षय पचांगेला सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

अकोट तालुक्यातील आंबोडा येथील शुभम शिवरकर या आठ वर्षीय बालकाचे त्याच्या परिचित लोकांनीच अपहरण केले होते. बिंग फुटू नये म्हणून त्याची हत्या केली होती. हे प्रकरणसुद्धा खंडणीसाठी घडले होते. यातील आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

अपहृत बालिकेची हलाखीची परिस्थिती
अपहरण झालेल्या मनश्री लाकडेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, तिचे वडील बांधकाम करताना लागणाऱ्या सेंट्रिंगचे काम करतात. तिला एक मोठी बहीण आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे पैशांसाठी अपहरणाची शक्यता नसल्याचे बोलल्या जात आहे.

पोलिसांनी तपासले सीसीटीव्हींचे फुटेज
आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, त्यातून काही विशेष निष्पन्न झाले नाही. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिस निरीक्षक कैलास नागरे आणि पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अपहरणानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. इन्सेट : मनश्री लाकडे. छाया : सोनू सावजी

प्रत्यक्षदर्शी रामने कथन केला प्रकार
याघटनेला एक राम नावाचा दहा वर्षीय बालक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्याने शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक कैलास नागरे यांना माहिती दिली. रामने दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिला ही कोरकू बोलत होती. तिने मनश्रीला सोबत चालण्यास सांगितले. रामने त्या दोघींचा पिच्छाच सोडला नाही. त्यामुळे त्या महिलेने रामला २५ रुपये दिलेत. मोबाइलचे आयडिया कंपनीचे रिचार्ज व्हाऊचर चॉकलेट आणण्यासाठी पाठवले. राम दुकानात गेल्यावर संबंधित महिला मनश्रीला घेऊन पसार झाली होती. परत आल्यावर त्या दोघी दिसल्याने रामने ही माहिती मनश्रीच्या आईला सांगितली. त्यानंतर मनश्रीचे अपहरण झाल्याचे उघडकीस आल्यावर हलकल्लोळ माजला.
बातम्या आणखी आहेत...