अकोला- शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक केल्याप्रकरणी श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर सुधीर जोशी याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. याप्रकरणी जामीन अर्जावर एकदा निर्णय झाल्यामुळे पुन्हा निर्णय होऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.
अकोला पोलिसांनी समीर जोशी, त्याची पत्नी पल्लवी जोशी आणि इतरांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. यानंतर समीरला १५ आॅक्टोबर २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. समीर जोशी, पल्लवी जोशी यांच्यासह ११ आरोपींवर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अटकेपासून समीर जोशी नागपूर येथील कारागृहात आहे. आरोपीचे वकील आशिष देशमुख यांनी समीर जोशीला जामीन मिळावा म्हणून दुसरे जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने म्हटले की एकदा याच प्रकरणात जामीन अर्जावर निर्णय दिलेला आहे आणि परत याच मुद्यावर सुनावणी होऊ शकत नाही. त्यावर आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना सांगण्यात आले की, या गुन्ह्यामध्ये सहा वर्षांची शिक्षा आहे आणि आरोपी तीन वर्षांपासून कारागृहात आहे. पोलिसांनी तपासात कोणतीही प्रगती आजपर्यंत केली नाही. इतर आरोपींचीही मालमत्ता पोलिसांनी जप्त केली नसून करोडो रुपयांची मालमत्ता जप्त करणे बाकी अाहे. इतर आरोपी दीड वर्ष फरार असतानाही त्यांना जामीन मिळाले आहेत. त्यानुसार आरोपी समीर जोशीलाही जामीन द्यावा, अशी विनंती आरोपी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने पुन्हा याच मुद्यावर सुनावणी होऊ शकत नाही, म्हणून समीर जोशीचा जामीन अर्ज फेटाळला. सरकारपक्षाच्या वतीने अॅड. गिरीश देशपांडे यांनी तर आरोपी पक्षाच्या वतीने अॅड. आशिष देशपांडे यांनी काम पाहिले.