आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ हजार रुपयांसाठी केली हत्या, आरोपींनी सांगितला घटनाक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा- व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यासाठी सतत लावलेल्या तगाद्याला कंटाळून रमेश कुकडेचा काटा काढल्याची कबुली तालुक्यातील पाथर्डी येथील बहुचर्चित रमेश कुकडे हत्याकांडातील आरोपींनी पोलिस कस्टडीदरम्यान दिली. अवघ्या १५ हजार रुपयांसाठी हत्या करण्यात आली. घटनास्थळी नेल्यानंतर आरोपीला रडू कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तालुक्यातील पाथर्डी येथील रमेश उत्तमराव कुकडे यांच्याकडे कामाला असलेल्या विनायक वासुदेव कुकडे याने त्यांच्या बटाईने केलेल्या शेतीसाठी ९० हजार रुपये व्याजाने घेतले होते. मात्र, गतवर्षी दुष्काळ असल्याने त्याच्या शेतात पीक झाले नाही. त्यामुळे तो मुद्दल रकमेसह व्याजाची रक्कम परत करू शकला नाही, तर दुसरा आरोपी शंकर वासुदेव नेरकर या आरोपीनेही मृतक रमेश कुकडे यांच्याकडून १५ हजार रुपये घेतले होते. दोन्ही आरोपीकडे असलेल्या पैशासाठी रमेश कुकडे वारंवार आरोपींना पैशाची मागणी करत होते. पैसे द्या अन्यथा तुमचे घर माझ्या नावाने करा, असा तगादा आरोपींना लावत होते. वारंवारचा तगादा पैशासाठी रमेश कुकडे यांच्याकडून वापरण्यात येणाऱ्या हीन भाषेला आरोपी कंटाळले होते. मृतकाला संपवले तर आपल्याकडे असणारे पैसे आपल्याला द्यावे लागणार नाहीत, अशी भावना त्यांच्या मनात तयार होऊन त्यांनी रमेश कुकडे यास संपवण्याचा उद्देश मनात घेऊन आरोपी विनायक कुकडे याने दुसरा आरोपी शंकर नेरकर यास आपली भावना बोलून दाखवली. आरोपी विनायकने सांगितलेली बाब शंकरला पटली. त्याने त्यास सहमती दर्शवली. नंतर त्यांनी रमेश कुकडे यांना संपवण्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणे १५ जूनला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास आरोपी विनायक कुकडे याने रमेश कुकडे यांना फोन करून मुंडगाव रस्त्यावरील मारोती मंदिराजवळ तुम्हाला पैसे द्यायचे म्हणून बोलावले. तेथे पोहोचताच दोन्ही आरोपींनी रमेश कुकडे यांच्यासोबत गप्पा केल्या. नंतर विनायक तेथून दूर अंतरावर गेला. तेथे असणाऱ्या शंकरने आधीच इंधन तोडण्याच्या बहाण्याने कुऱ्हाड आणली होती. रमेश कुकडे यांची पाठ त्याच्याकडे होताच शंकरने कुऱ्हाडीने रमेश कुकडे यांच्यावर सपासप वार केले. मृत्यू झाल्याची खात्री पटताच त्याने दुसऱ्या आरोपीस पोते घेऊन लवकर येण्यासाठी हाक मारली. दोघांनी रमेश कुकडे यांचे शरीर पोत्यात भरून नाल्यातीलच एका काटेरी झुडुपात लपवून ठेवले होते. नंतर मृतकाच्या नातेवाइकांसोबत हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला आले. शोधाशोध करण्याचा देखावा केल्याची बाब दोन्ही आरोपींनी पोलिसांसमोर विशद केली. हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त करण्यासाठी आरोपीस पोलिसांनी नेले असता आरोपी शंकर नेरकर यास रडू कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काही दिवसांतच लावला छडा
तेल्हारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांनी मृतदेह सापडल्यानंतर अल्पावधीतच आरोपींचा छडा लावला. दोन्ही आराेपींना अटक केली. हत्येसाठी वापरलेले शस्त्र आरोपींकडून जप्त केले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मनवरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार नंदकिशोर नागलकर, पोलिस उपनिरीक्षक शरद भस्मे, रामभाऊ भास्कर, पोलिस हेडकॉन्स्टेबल अनिल खिल्लारे यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...