आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे भाजपवालेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला / अकोट - केंद्रातील मोदी सरकार राज्यातील भाजप-शिवसेना सरकारचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण संतापजनक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी केला आहे. अकोट येथील दुष्काळग्रस्त शेतकरी परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला सपशेल अपयश आले असून, सरकारची मानसिकता शेतकरीविरोधीस आहे. केंद्रातील मोदी सरकार राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर त्यांनी टीका केली. भाजपच्या नेत्यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यांतून या पक्षाची शेतकरीविरोधी भूमिका दिसून आल्याचा आरोप खासदार चव्हाण यांनी केला.

शेतकरी पॅकेजच्या नावाखाली तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे. हेक्टरी ४५०० रुपये मदत जाहीर करतानाही लहान शेतकऱ्यांना हेक्टरपर्यंत मर्यादा घालून त्यापेक्षा नाममात्र अधिक शेती असणाऱ्यांना केवळ एक हेक्टरपर्यंत मदत देण्याचा बनवाबनवीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे. दुष्काळाबाबत तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. मात्र, सरकार असंवेदनशील असल्यामुळे तसे करत नाही. पावसाळा संपल्यावर आणेवारी काढू नंतर उपाययोजना करू, असे भाजपच्या मोठ्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. अशा नेत्यांच्या बुद्धिमत्तेची आपल्याला कीव येते, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. ते आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात दुष्काळ पडला असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष दुष्काळ जाहीर करण्यासाठी १५ सप्टेंबरनंतर आणेवारीची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणताही प्रतिसाद सरकारकडून नाही. दुष्काळाचा काळ असल्यामुळे काँग्रेसला राजकारण करायचे नाही. सर्वपक्षीय नेत्यांची सरकारने बैठक घेऊन उपाय योजना कराव्यात, असा प्रस्ताव आपण सरकारकडे मांडला. मात्र, त्यावर सरकारचे उत्तर नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती स्फोटक असताना सरकार केवळ पोकळ घोषणा करत आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. रोजगार हमी योजनेद्वारे मागेल त्याला काम नाही. बिहारला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पॅकेज दिले, महाराष्ट्राला आज पॅकेजची खरी गरज आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा दौरा करावा शेतकऱ्यांना पॅकेज द्यावे, असेही चव्हाण म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, महानगराध्यक्ष मदन भरगड, मनपा विरोधी पक्षनेता साजिदखान पठाण, जिल्हा परिषदेच्या सभापती राधिका धाबेकर, काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, जिल्हा महासचिव प्रकाश तायडे, राजेश भारती, अविनाश देशमुख, कपिल रावदेव, राजेश भारती, उषा विरक यांची उपस्थिती होती.

आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट
उगवागावातील आत्महत्या केलेले शेतकरी संतोष अंबादास शिरसाट यांच्या कुटुंबीयांवर असलेले बँकेचे कर्ज काँग्रेस पक्षाने आज भरले, तर अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार, करोली, टाकळी खुर्द, टाकळी बु., देवरी फाटा या गावांना प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी भेट दिली. आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करून पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.