आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनमधील सिलिंडर काढून कुणीतरी ठेवले रेल्वे रुळावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या अकोटफैल जवळील पुलाखाली मुंबई- नागपूर रेल्वे लाईनवरील रुळावर कुण्यातरी अज्ञाताने अग्निरोधक सिलिंडर (आग विझवण्याचे यंत्र) ठेवले. दरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर वाजून मिनिटांनी नागपूरच्या दिशेने जाणारी मालगाडी आली आणि या मालगाडीने ते अग्निरोधक १०० फुटापर्यंत घासत नेले. गाडीने पटरी बदलल्यानंतर हे सिलिंडर फेकल्या गेले. यावेळी चिंगाऱ्या उडत असल्याचे रेल्वे चालकाच्या लक्षात आले. त्यांनी स्टेशन प्रबंधकांना माहिती दिली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बल रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहचले. या घटनेने रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 
 
रेल्वेस्थानकापासून ५०० फुट अंतरावर अकोटफैलला जोडणारा उड्डाण पूल आहे. या पुलाखालून रेल्वे धावतात. शनिवारी आऊटवर एक रेल्वे इंजिन उभे होते. या इंजिनमध्ये असलेल्या चार पैकी एक अग्निरोधक सिलिंडर कुण्यातरी अज्ञाताने काढले आणि ते पुलाखाली डाऊन लाईनवर ठेवले. त्यानंतर नागपूरच्या दिशेने जाणारी मालगाडी आली. या गाडीच्या चाकाखाली ते सिलिंडर आल्याने १०० फुटापर्यंत हे गाडीच्या पिंजऱ्याला अडकून घासत गेले. त्यानंतर ते फुटले. त्याचा अंदाज रेल्वेच्या चालकाला आल्यानंतर त्याने रेल्वे स्थानक प्रबंधकांना माहिती दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी पोलिस घटनास्थळी पोहचले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर रविवारी सकाळी अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांनी पाहणी केली. यावेळी आरपीएफचे अधिकारी, रेल्वेचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत केंगळे, रेल्वे पोलिस ठाण्याचे ठाणेदार एस.डी. वानखडे, दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक कुलट यांनीही स्वतंत्र तपास केला. 

पुलाखाली रेल्वे इंजिन उभे होते. या इंजिनमध्ये रात्रीच्यावेळी कुणीही नव्हते. इंजिनचा दरवाजा उघडा असल्याने चारपैकी एक अग्निरोधक अज्ञाताने काढले आणि ते रुळावर ठेवले. 

कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह 
रेल्वे स्थानकाच्या ५०० फूट अंतरावर उड्डाणपुलाजवळ रात्री ही घटना घडली. मात्र या घटनेचा थांगपत्ता आरपीएफला लागू नये, म्हणजेच आरपीएफच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे घटनास्थळापर्यंत मालधक्का आहे. त्यामुळे येथे आरपीएफची नजर असणे आवश्यक आहे. 

घातपाताची शक्यता, एटीएस घटनास्थळी 
अग्निरोधक सिलिंडर हा पुलाखाली असल्याने आणि रेल्वे रुळावर असल्याने घातपाताची शक्यता असण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या जागी जर सिलिंडरचा स्फोट झाला असता आणि प्रवाशी गाडी जर असती तर मोठी दुर्घटना झाली असती. 

अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला 
^इंजिनचा दरवाजा उघडा असल्याने कुण्यातरी अज्ञाताने अग्निरोधक काढले. ते घेऊन जाण्याचा त्याचा इरादा असू शकतो. मात्र त्याने ते तेथेच फेकले असावे. घडलेली घटना गंभीर आहे. या प्रकरणी इंडियन रेल्वे अॅक्ट १५०, (१),(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेत आहोत. -एस.डी. वानखडे, ठाणेदार रेल्वे पोलिस 
 
बातम्या आणखी आहेत...