आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्यांमधील डीबी स्कॉड बनतेय वसुली एजंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात डीबी स्कॉड आहे. डीबी स्कॉड पोलिस निरीक्षकांसाठी महत्त्वाचा मदतनीस असतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पोलिस ठाण्यातील डीबी स्कॉडच्या "चलती'वरून इतर कर्मचाऱ्यांमध्ये कायम नाराजी सुरू आहे, तर ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांची प्रकरणे "सेटल' करण्यात डीबी स्कॉड ताकद पणाला लावत असल्याचे दिसून येत आहे.
डीबी स्कॉडमधील कर्मचारी साध्या वेशात वावरत असतात. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारीवर त्याचा वचक असतो आणि तसे अपेक्षितही असते. मात्र, डीबी स्कॉड ठाणेदारांची "मर्जी' सांभाळणारा घटक झाल्यामुळे आपले मूळ कर्तव्यापासून हे कर्मचारी दूर जात आहेत. डीबी स्कॉड कर्मचाऱ्यांना आरोपी शाेधून काढण्याचे टार्गेट असायला हवे. मात्र, ते नसल्यामुळे पोलिस व्हॅनमध्ये फिरून केवळ हितसंबंध जोपासण्यासाठी हे कर्मचारी धडपळ करीत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक पोलिस ठाण्यांतील डीबी स्कॉडचे कर्मचारी तर वसुलीमध्ये माहीर असल्याचे सर्वश्रुत आहे. अनेक डीबी स्कॉडच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक वेळा नाव जाहीर करता काहींनी तक्रारीही केल्या आहेत. मात्र, त्यांचा कुणालाही काही फरक पडलेला दिसून येत नाही.

विशेष पथकाच्या कारवाया मंदावल्या : जिल्हापोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यामध्ये पोलिस ठाण्यांवर वचक निर्माण करण्यासाठी विशेष पथकाचे गठन केले आहे. गेल्या वर्षी या पथकाची चांगली कामगिरी होती. या पथकातून एका उत्साही आणि कामाला महत्त्व देणाऱ्या एका पोलिस उपनिरीक्षकाला पथकातून काढले तेव्हापासून या पथकाच्या कारवाया मंदावल्या. विशेष म्हणजे हे पथक जरी पोलिस अधीक्षकांच्या अखत्यारीत असले, तरी या पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी ही सहायक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असल्यामुळे कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करताना त्याच्यावर ठाणेदाराचा दबाव येतोच, कारण जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पुरेसा वेळ नसल्यामुळे प्रत्येक विषय त्यांच्याशी चर्चा करूनच पुढे जाईल, असे नाही.

डीबीच्याकर्मचाऱ्यांची घरे त्याच ठाण्याच्या हद्दीत कसे : डीबीस्कॉडमधील कर्मचारी त्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शक्यतो नसावा, असा नियम अाहे. मात्र, बहुतांश डीबीचे कर्मचारी ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहेत, त्याच हद्दीतील पोलिस ठाण्यात ते नोकरी करतात. असे असेल तर कारवाया कशा होतील, याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
यापूर्वीहीझाले आहेत आरोप : डीबीस्कॉडमधील पोलिसांवर यापूर्वीही देवाणघेवाणीचे आरोप झाले आहेत. त्या कारणांमुळे पोलिस ठाण्यातील डीबी स्कॉड काही दिवस बरखास्तही करण्यात आले होते, तर दीड वर्षांपूर्वी रामदासपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि डीबी स्कॉडमधील काही पोलिसांवर कारवाई म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांना हेड क्वॉर्टर अटॅच केले होते. मात्र, पुन्हा त्यांना पोलिस ठाणे देण्यात आले असून, काहींना तर पुन्हा डीबी स्कॉडमध्ये संधी देण्यात आल्याची माहिती आहे.

डीबी स्कॉडचा वचक वसुलीपुरता
पोलिस ठाण्यातील डीबी स्कॉड हे वसुलीचे केंद्र होऊ नये, याकडे वरिष्ठांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. मात्र, दिवसभर स्कॉडचे कर्मचारी डीबी रूममध्ये असून, आपला वेळ वाया घालवत असतात. एखाद्या आरोपीला पकडून आणलेच तर त्याच्यावरच त्याने केलेल्या गुन्ह्यांचाही भार त्याच्या माथी मारण्याचे प्रकार अनेक वेळा घडतात. दरम्यान, डीबी स्कॉडचा वचक वसुलीपुरताच आहे, असे तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अवैध धंदे सुरू नाहीत अशी एकाही पोलिस ठाण्याची हद्द नाही. मग हे अवैध धंदे चालतात कसे, हा प्रश्न आहे. घरगुती वापराचे सिलिंडर चार हॉटेलपैकी एका दुकानात दिसून येतो. पण, कारवाई नाही. जुगार, वरली, दारूची अवैध विक्री शहराला नवीन नाही. मात्र, अशांवर दररोज कारवाई होत नाही. त्यामुळे डीबीवर होणाऱ्या वसुलीच्या आरोपाला बळ मिळते.
बातम्या आणखी आहेत...