आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह ठाण्यात नेऊन ठेवल्याने खळबळ, मूर्तिजापुरातील दुकानदाराचा अचानक मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - येथील स्टेशन विभागातील रहिवासी रामाभाऊ भटकर यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात नेऊन ठेवल्याने खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. अचानक उद््भवलेल्या या परिस्थितीमुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती. जवळपास साडेतीन तासांनंतर याप्रकरणी चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह हलवण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, येथील बसस्थानकासमोर शर्मा यांची बिल्डिंग आहे. यामध्ये रामाभाऊ भटकर यांचे मीना साडी सेंटर आहे. या दुकानावरून भटकर शर्मा यांच्यात वाद झाल्याने हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. आज सकाळी भटकर दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना दुकानाचा फलक एका बाजूने निघून लाेंबकळत असल्याचे दिसले. त्यावरून भटकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली ते घरी परतले. काही वेळात त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचा मृतदेह थेट पोलिस ठाण्यात आणून ठेवला रामाभाऊंच्या मृत्यूस शर्मा हेच जबाबदार असल्याचा आरोप केला.

शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी करत मृतदेह हलवण्यास नकार दिला. आज बाजाराचा दिवस असल्याने अनुचित घटना घडू नये यासाठी बोरगावचे ठाणेदार, माना येथील ठाणेदारांसह अतिरिक्त पोलिसही बोलावले होते. शेवटी प्रभारी एसडीपीओ चव्हाण अकोला एलसीबीचे पोलिस निरीक्षक अन्य अधिकाऱ्यांनी ठाण्यात धाव घेत संबंधित दोषींची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला. त्यानंतर तणाव निवळला.