आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिलॅबसमध्ये हवेत राष्ट्रसंतांचे विचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दहावीपर्यंत शिक्षण होऊनही विद्यार्थ्यांना तुकडोजी महाराज, गाडगेबाबा माहीत नसतात. शाळेत फक्त त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यापुरते ते मर्यादित राहू नये, त्यांच्या विचारांची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याची गरज आहे. अनेक देशांत झालेल्या क्रांतीचा इतिहास मुलांना शिकवताना शालेय अभ्यासक्रमात राष्ट्रसंतांच्या विचारांचा, कार्याचा समावेश व्हावा, असे प्रतिपादन अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांनी केले. स्वराज्य भवन येथे शुक्रवार, आठ जानेवारी रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यंदाचे हे ११ वे वर्ष आहे. महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात शिरीष धोत्रे यांनी ग्रामगीता प्रत्येक घरांत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पुढची पिढी चांगली घडवण्यासाठी राष्ट्रसंतांच्या विचारांशिवाय पर्याय नाही. आदर्श गावाची संकल्पना राबवताना आधी माणूस घडवणे आवश्यक आहे आणि चांगला माणूस घडवण्याची ताकद ग्रामगीतेत आहे. मुलांना शाळेत चौथीत शिवाजी महाराजांचा इतिहास वगळता इतर कोणत्याही संतांची किंवा महापुरुषांची ओळख होत नाही. शालेय अभ्यासक्रमात या विचारांची अधिक गरज असून, त्यातूनच एक चांगला माणूस घडेल. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात या महान पुरुषांची नुसती ओळख होऊ नये तर त्यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावे, असे त्यांनी सांगितले.
सर्व ग्रंथांचा सार हा ग्रामगीतेत सांगितलेला आहे. माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकासाठी ग्रामगीता महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक घरांत ग्रामगीता असून उपयोग नाही, तर त्याचे आचरण होणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ प्रचारक उद्धवराव गाडेकर यांनी केले. ग्रामगीतेतील विचार ऐकायला, वाचायला सोपी वाटत असले तरी ते पचवायला अवघड आहे. ते समजून घेऊन, जीवनात आचरण केल्यास जीवनाचा उद्धार निश्चित आहे. प्रत्येक घरांत ग्रामगीता पोहोचली पाहिजे. त्याशिवाय विकास अशक्य आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रसंतांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी तरुणाईचा सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे मत मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे यांनी व्यक्त केले. सांसद अादर्श ग्राम समितीचे सदस्य औरंगाबाद येथील भाष्करराव पेरे पाटील, प्रकाश रुहाटिया यांनी विचार मांडले. समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेतला. उद््घाटन सत्राच्या प्रारंभी कृष्णनगरी येथील श्री गुरुदेव युवती भजन मंडळाने स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी म्हैसने यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गजानन काकड यांनी केले. या वेळी माजी आमदार बबनराव चौधरी, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, रवींद्र मुंडगावकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, आमले महाराज, तिमांडे महाराज, सावळे गुरुजी, अॅड. रामसिंग राजपूत, अॅड. वंदन कोहाडे, सुभाष म्हैसने, मधुकर सरप, श्रीकांत बिहाडे, प्रशांत गावंडे, बाबूराव लोखंडकार, हरी महाराज, किशोर वाघ, रामदास महाले उपस्थित होते.

शोभायात्रेत सहभागी झालेल्या दिंडी पथकांचा सत्कार करण्यात आला. यात लेझीम पथकाचे सुरेश ठाकरे, गुलाबबाबा दरबार म्युझिक बँडचे ठाकूर, नावकार, विश्वासराव वालशिंगे, डॉ. माने, काळे महाराज, गजानन काळे, मीरा बोदडे, ठाकरे, भाष्करराव काळमेघ, शिवदास महाराज भेंडे, मधुकरराव काकड, विलास राऊत, दादाराव सांगळे, गणेशराव बेले, त्र्यंबकराव पाटील यांच्यासह लहान मुलांना गौरवले.

भाऊसाहेबांच्या नावाने दिला जाणार रोख पुरस्कार
शिक्षण क्षेत्रात गुरुदेवांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या नावाने पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्याचे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी जाहीर केले.

जीवन गौरव पुरस्काराने पेरे पाटील यांना केले सन्मानित
राष्ट्रसंतांच्या विचारांना सत्यात उतरवून गाव आदर्श करणारे पाटोदा ग्रामपंचायतचे माजी सरपंच औरंगाबाद येथील भाष्करराव पेरे पाटील यांना स्व. कालूराम रुहाटिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी लोकांचा सहभाग याबाबत माहिती दिली.

ग्रंथदिंडीने वाजले महाेत्सवाचे बिगुल
४७व्या पुण्यतिथी महोत्सवाचा बिगुल ग्रंथदिंडीने वाजला. नगरीचे आराध्यदैवत राजराजेश्वर मंदिर येथे मंदिर समितीचे अध्यक्ष दादा देशपांडे, संदीप देशमुख यांच्या हस्ते ग्रंथपूजनाने दिंडीला सुरुवात झाली. जय हिंद चौक, सिटी कोतवाली चौक, गांधी रोड मार्गे खुले नाट्यगृह, मदनलाल धिंग्रा चौक मार्गे स्वराज्य भवन येथे दिंडीचा समारोप झाला. या दिंडीत आठ महिला भजनी पथक, एक लेझीम पथक, ढोलताशांचे पथक सहभागी झाले होते. आकर्षक सजवलेल्या तीन बैलगाड्यांनी लक्ष वेधले, तर राधा कृष्णचा जिवंत देखावा आकर्षणाच्या केंद्रस्थानी होता. वारकरी मंडळींसोबत पावली खेळणारे, मृदंगांचा ठेका धरणाऱ्या शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी रंगत वाढवली.

शोभायात्रेदरम्यान टाळ मृदंगाच्या गजरात महिला भाविक तल्लीन झाल्या होत्या.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. तत्पूर्वी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात अाली हाेती. मिरवणुकीत टाळ-मृदंगाच्या नादात राष्ट्रसंतांना अभिवादन करण्यात अाले. ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाचा बिगुल ग्रंथदिंडीने वाजला. शहराचे आराध्यदैवत श्रीराजराजेश्वर मंदिरातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. छाया: नीरज भांगे