आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्याचा विकास करा, मी पाठीशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोल्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. मागाल तेवढा निधी देतो. मात्र, नियोजन आणि लोकसहभागातून अकोल्याचा विकास करा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे, असे वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोलेकरांना दिले. कोट्यवधींच्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी गुरुवारी ते अकोल्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, विदर्भात चार महानगरपालिका आहेत. त्यांना सरकार पाहिजे तेवढा निधी देण्यासाठी तयार आहे. सध्या कॉटन सिटीला वाईट दिवस आले आहेत, हे खरे असले तरी कापसावर प्रक्रिया उद्योग उभारण्यावर सरकारचा भर आहे. बंद पडलेल्या नीळकंठ सूतगिरणीचे पुनर्जीवन लवकरच केल्या जाईल. त्यासाठी एनसीडीसीकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल. अकोला शहराकरिता मूलभूत सेवेसाठी ३५ कोटी आणि कालच १५ कोटी रुपये आपण दिले आहेत. युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी पावले उचलली असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मिशन दिलासा अभियानाचे विशेष कौतुक केले, तर आमदार हरीश पिंपळे यांच्या विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, तर प्रमुख उपस्थितांमध्ये खासदार संजय धोत्रे, महापौर उज्ज्वला देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, आमदार पांडुरंग फुंडकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार बळीराम सिरस्कार, आमदार रणधीर सावरकर, खामगावचे आमदार आकाश सानंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदरसिंग, जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आँचल सूद, मनपा आयुक्त अजय लहाने, एसडीअाे प्रा. संजय खडसे, कार्यकारी अभियंता आर. के. सरोदे, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. अविनाश लव्हाळे, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या प्रास्ताविक भाषणाने सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे. रक्तगटानुसार त्यांचे कामही बी पॉझिटिव्ह आहे. कधी नव्हे आता अकोल्याला "अच्छे दिन' मुख्यमंत्र्यांच्या रूपाने आल्याचा परिचय दिला. मिशन दिलासा अभियानामुळे महिन्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा १६ वरून वर आल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा यांनी भाषणातून जिल्हाधिऱ्यांचा उल्लेख केला.

"छा गये कलेक्टर!'
शर्मा म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत माझी बदनामी केल्या जाते, तरीही मीच निवडून येतो. त्यानंतर डॉ. पाटील भाषणात लालाजींची बदनामी कुणीच करू शकणार नाही, असे म्हणाले.

{मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. ते लक्षात घेऊन सरकारने मैदानी खेळांवर लक्ष केंद्रित केले आहे. बॉक्सिंगसाठी इमारत उभारल्या जाणार असल्यामुळे भविष्यात अकोला मेडल देईल, असा उल्लेख त्यांनी केला.

महापौर, आयुक्त नगरसेवकांना आवाहन
पिण्याचे पाणी, सांडपाणी आणि स्वच्छतेच्या कामावर महापौर, आयुक्त नगरसेवकांनी लक्ष द्यावे. त्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल. आपण ३५ कोटी अमृत योजनेतून दिले आहेत, तर कालच १५ कोटी रुपये आपण दिल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

जी. श्रीकांत प्रा. खडसे यांचा गौरव
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत एसडीअाे प्रा. संजय खडसे यांनी सुरू केलेल्या "मिशन दिलासा'चा विशेष गौरव केला. तसेच "आय लव्ह अकोला!' या मोहिमेचेही कौतुक केले. पहिल्यांदाच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या कार्याचा प्रत्येकाच्या भाषणात उल्लेख झाला.