आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गरीबांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जोपर्यंत गरिबाच्या हातात सत्ता येणार नाही, तोपर्यंत बदलाला सुरुवात होणार नाही. म्हणून आता स्वकीयांशी लढाई आहे. सध्या देशात राज्यकर्ता आणि व्यापारी हे दोघे लुटारू आहेत. त्यांच्यामुळे शेतकरी सर्वसामान्याची लूट सुरू आहे, असा आसूड भारिप बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्ल्लागार अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्य केंद्र सरकारवर ओढला. ते बुधवारी धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त आयोजित धम्म मेळाव्यात लाखाेंच्या संख्येने उपस्थित अनुयायांना संबोधित करताना बोलत होते.
अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केंद्र सरकार राज्य सरकारच्या नीतीवर आक्षेप घेत सरकारवर टीका केली. अॅड. अांबेडकर म्हणाले की, हे सर्वसामान्यांचे तथा शेतकऱ्यांचे सरकार नाही. देशातील वातावरण बदलवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे आपल्या हातची व्यवस्था हळूहळू निघून जात आहे. कौशल्य विकासाच्या नावावर जातीय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहेत. त्याचे परिणाम पुढील काळात दिसून येतील. शिक्षणात गुरुकुल पद्धत आणून वैदिक परंपरेतलं शिक्षण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज ७० टक्के तरुणपीढीच्या हाताला काम नाही. पुन्हा एकदा नव्याने या तरुणांचा वापर होत आहे. स्वकीयांशी लढा देणे आज आवश्यक झाल्याचे सांगतांना ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी आता आपल्याला कोण लुटत आहे, यात लक्षात घालणं महत्त्वाचे आहे. त्यांना ओबीसी, दलित लुटत नाही, तर राज्यकर्ता व्यापारी लुटत आहेत, असेही ते या वेळी म्हणाले. भव्य धम्म मेळाव्याचे अध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी तर चैत्यभूमीचे व्यवस्थापक भन्ते बी. संघपाल मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

मेळाव्याला आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, कार्याध्यक्ष काशिराम साबळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्ला खान पठाण, भारिपचे ज्येष्ठ नेते डी. एन. खंडारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा परिषद सभापती रेखाताई अंभोरे, सभापती देवकाताई पातोंड, डॉ. डी. एम. भांडे, डॉ. हर्षवर्धन मालोकार, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रतिभा अवचार, प्रसेनजीत पाटील, दामोदर जगताप, सुभाष रौंदळे, गजानन गवई, डॉ. प्रसन्नजीत गवई, विकास सदांशिव, प्रदीप सिरसाट, पराग गवई यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन राजाभाऊ लबडे यांनी केले, तर आभार भीमराव तायडे यांनी मानले.

मराठा मोर्चावर सरकारला उत्तर द्यावेच लागेल :मराठा मोर्चांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. सरकारला त्यावर उत्तर द्यावेच लागेल. मात्र, त्यासाठी मनुवाद सोडावा लागेल मानवतावाद धरावा लागेल. सरकारने आता ऑपरेशन टेबल सुरू केले आहे. जो सरकारच्या विरोधात जातो त्याचे ऑपरेशन सुरु केले आहे. कारण आरएसएसवाले लहान लहान राजकीय पक्ष टिकू देणार नाहीत, असा गर्भित इशाराही अॅड. आंबेडकर यांनी दिला.

समानअधिकार नसतील तर हिंदू राष्ट्राचे काय करायचे :सध्या देशावर संकट ओढवून घेतले आहे. त्यावर मात करायची असेल तर सरकारच्या खेळाला बळी पडता शांतता ठेवावी लागेल. संघवाले हिंदू राष्ट्र करायला निघाले आहेत. मात्र त्यांच्या राष्ट्रात समान अधिकार नसतील तर त्याचे काय करायचे असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.

आता पेशवाई छत्रपतींना नेमत आहे
सर्वांनी आता जुन्या मानसिकतेतून बाहेर पडावे. राजेशाही संपली लोकशाही सुरू झालेली आहे. आता जातीसंगे माती खावू नका, तर समदृष्टीसाठी माती खा, असेही अॅड. बाळासाहेब अांबेडकर म्हणाले.

पूर्वी छत्रपती पेशवाईंच्या नेमणूका करत होते. आता चित्र बदलले आहे. पेशवाईच छत्रपतींची निवड करत आहे, असा उलटा काळ आल्याचे बाळासाहेब आंबेडकर म्हणाले.
सैनिकांचे राजकियीकरण सुरू झाले : केंद्र सरकारने आता सैनिकांचेही राजकियीकरण सुरू केले आहे. तसे मार्केटिंग चालले आहे. पाकिस्तानचे जे करायचे ते टेबलाच्या खालून करा. वरून करू नका. मात्र, सरकार ते जाणून बुजून करत आहे. कारण उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत. असे केल्याशिवाय आपले सरकार येणार नाही. म्हणून सैनिकांचे मार्केटिंग सुरू आहे, असा आरोप मेळाव्यात बाेलताना अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला.

यशवंतरावांची कास धरावी : यशवंतराव चव्हाणांनी व्यापाऱ्यांना हाकलून दिले होते. त्यांनी पर्यायी बाजार समित्या तयार केल्या. त्यानंतर याच पर्यायी व्यवस्थेतील राज्यकर्ते सत्तेत बसले. पुन्हा एकदा मराठा समाजाने यशवंतरावांची कास धरावी. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा कमी दराने माल घेतल्या जात असेल तर बाजार समितीच्या संचालकांची चौकशी करून त्यांची मालमत्ता जप्त करावी. त्यासाठी स्वकींयाशी लढावे लागेल, असे आंबेडकर म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...