आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यापाऱ्यांना एलबीटी माफ, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- केंद्रराज्य सरकार शेतकरी संपवायच्या मागे लागले आहेत. त्यांना शेतकऱ्यांशी काहीही घेणे देणे नाही. राज्य सरकारने २४ महापालिकेअंतर्गत १७ हजार व्यापाऱ्यांची हजार कोटींची एलबीटी माफ केली. म्हणजे पाच वर्षांसाठी ३५ हजार कोटी रुपयांची एलबीटी माफ करण्यात आली. परंतु, शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीकरिता या सरकारकडे दहा हजार कोटी नाहीत. या सरकारने शेतकऱ्यांची एक पिढी बरबाद केली आहे, असा आरोप विधान सभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. तसेच बुलडाणा जिल्हा हा पहिला जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यातून संपूर्ण कर्जमुक्तीसाठी २५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज आले असून, हे अर्ज स्वत: मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

खुपगाव येथून संपूर्ण कर्जमुक्ती स्वाक्षरी अभियानास सुरुवात करण्यात आली होती. त्या अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन बुलडाणा विधानसभा अध्यक्ष नरेश शेळके, तालुकाध्यक्ष डी. एस. लहाने यांनी सोमवारी येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात केले होते. या वेळी मुंडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र शिंगणे होते. जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ, श्रीकांत पिसे, कृष्णराव इंगळे, साहेबराव सरदार, भारत बोंद्रे, लक्ष्मी शेळके, सुलोचना पाटील, रेखा जाधव, आशा झोरे, प्रा. विष्णू पाटील, आशा पवार, संताेष पाटील, अनिता शेळके, नीलेश देठे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी मुंडे म्हणाले की, हे सरकार आम्हाला घोटाळेबाज म्हणून खोटे आरोप करत आहे. परंतु गेल्या १७ महिन्यांत याच सरकारच्या आठ मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले. अडीच हजार ते तीन हजार रुपयांचे हे घोटाळे आहे. लहान मुलांचा चिक्की घोटाळा, सात रुपयांचा फोटोची किंमत १,४०० रुपये करण्याचा घोटाळा, पत्नीच्या नावाने जमीन खरेदी घोटाळा असे अनेक घोटाळे असून ते आपण अधिवेशनात बाहेर काढणार आहोत. नवसात झाल अन् मुके घेऊन मेलं असा कार्यक्रम या शासनाचा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

जिल्ह्यातअवैध धंद्यांना ऊत : जिल्ह्यातसध्या अवैधधंदे सर्रास सुरू आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिजाऊंच्या मातृभूमी सिंदखेडराजाला पत्त्याचे डाव सुरू असून, मराठवाड्यातील धनाढ्य लोकांच्या चारचाकी गाड्या एका ठिकाणी उभ्या राहतात. त्यानंतर या ठिकाणी पत्याचा डाव चालत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी केला.
बुलडाणा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना ना.मुंडे.

एकही मंत्री शेतकरी नाही
शेतकऱ्यांची कळवळ असणारा एकही मंत्री शेतकरी नसल्याचे सांगत मुख्यमंत्री मात्र आपण शेतकरी असल्याचे सांगतात. परंतु, मुख्यमंत्र्यांना अजूनही बसून गायीचे दुध काढता येत नाही. त्यामुळे आपण त्यांच्या वर्षा बंगल्यावर गाय घेऊन जाणार असून दुध काढावयास लावणार असल्याचा इशाराही मुंडे यंानी मुख्यमंत्र्यांना दिला. शिवसेना ही वाघ नसून शेळी आहे, असे म्हणणेही चुकीचे आहे. कारण शिवसेना ही आता ससा असल्याची टीकाही त्यांनी शिवसेनेवर केली.

जिल्ह्यातील सत्ताधारी ‘बिनकामाचे’
राष्ट्रवादीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यात विविध आंदोलने केली. दुष्काळ जाहीर करण्यासाठी मोर्चा काढला. पीक आणेवारी ५० पैशांच्या आत असतानाही जिल्ह्यातील सत्ताधारी खासदार आमदार दुष्काळ जाहीर करू शकले नाही. कोर्टाने फटकारल्याने तीन महिन्यानंतर जिल्हा दुष्काळ जाहीर करण्यात आला. हे पहिल्यांदाच घडल्याचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे या वेळी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...