आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कष्ट करण्याची क्षमता, तयारी असल्यास मिळते हमखास यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप मार्ग सांगितले जातात. पण, आपल्या ध्येयप्राप्तीसाठी झपाटून काम करणे महत्त्वाचे अाहे. झपाटून काम केल्यासच आपण आपले ध्येय गाठू शकतो. त्यासोबत कष्ट करण्याची क्षमता आणि तयारी असेल, तर कोणतेही यश मिळवणे अवघड नाही, असे प्रतिपादन भारतीय संघातील हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी केले. गीतानगर येथील एमराॅल्ड हाइट्स स्कूल येथे १५ नोव्हेंबर रोजी सीबीएसई पश्चिम विभाग हॉकी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
एमराॅल्ड स्कूलमध्ये अायाेजित हाॅकी स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी त्यांचा जीवनपट उलगडत नियमित परिश्रम करण्याचा मंत्र खेळाडूंना दिला. एका सामान्य परिवारात जन्मलेला मुलगा देशाच्या हॉकी संघात असेल, असा विचार कधी केला नव्हता. वडील, चार भाऊ हॉकीपटू असल्याने दुसरा खेळाचा पर्यायच नव्हता. हॉकी हे रक्तात भिनलेले आहे. पण, उच्च शिक्षण घेऊन नोकरी करून जे काही मिळते ते हॉकीने दिले आहे. जीवनात अडचणी येणे साहजिक आहे. पण, त्यातून मार्ग शोधणे आपले कार्य आहे. एखादे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून ते प्राप्त करण्यासाठी हवे ते कष्ट करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. हॉकीसाठी वेड, मेहनत करण्याची क्षमता आणि देशाप्रति असलेले प्रेम, या तीन गोष्टींमुळे या स्थानावर पोहोचता आहे. नियमित प्रयत्न केले, तर अनपेक्षित यश सहज मिळते, असे पिल्ले यांनी सांगितले. या वेळी ऑल इंडिया सीबीएसई स्पोर्ट्स विभागाचे संजीव त्यागी, इंद्रजित बासू, डी. डी. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय तुलशान, संचालिका अल्पा तुलशान, हॉकी असोसिएशनचे सचिव संजय बैस उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक खुशाल थानवी यांनी केले.

सांस्कृतिक कार्यक्रमाने आणली रंगत
उद्घाटन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य, गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. हेमंत जोशी या विद्यार्थ्याने लिहिलेल्या कवितेतून धनराज पिल्ले यांचा परिचय करून दिला. त्यानंतर विद्यार्थिनींनी स्वागतगीत म्हटले, तर ग्रुपने गणेश वंदना सादर केली.

कार्यक्रमात नियोजनाचे वाजले तीनतेरा
कार्यक्रमात नियोजनाची बाेंब दिसून अाली. सकाळी खेळाडूंनी हॉकीच्या साहाय्याने मैदानातील कचरा साफ केला, तर स्पर्धेच्या आदल्या दिवशी सराव करणाऱ्या कोणत्याच खेळाडूला जेवण किंवा नाष्टा मिळाला नाही. यामुळे खेळाडूंसह पालकांमध्ये नाराजीचा सूर हाेता.

लक्षवेधी पथसंचलन
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी मैदानातून पथसंचलन केले. विविध ड्रेस कोड, शाळेचे ध्वज घेऊन तालात चालणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. प्रत्येक संघाचा कर्णधार आणि खेळाडू यांना शाळेच्या शिक्षिका किरण यांच्या नेतृत्वात शपथ देण्यात आली.

‘रॅन्चो’चा कार्यक्रम
थ्रीइडियट चित्रपटात रॅन्चोने तयार केलेले विविध विज्ञानाचे प्रयोग सत्यात तयार करणारे रियल रॅन्चो यांचा कार्यक्रम झाला. शेख उस्मान शेख जहांगीर हे रियल रॅन्चो या नावाने ओळखल्या जातात. त्यांनी खेळाडूंसोबत संवाद साधला.

पिल्ले यांच्यासोबत सेल्फी घेण्याची क्रेझ प्रत्येक खेळाडूमध्ये पाहायला मिळाली. पूर्ण संघ यासह अनेक खेळाडू, प्रशिक्षकांनी या "रिअल हिरो'सोबत सेल्फी घेण्याचा चान्स सोडला नाही. उपस्थित असलेल्या प्रत्येकाला सेल्फीची क्रेझ होती.

धनराज पिल्ले यांच्या गोलने उत्साह
मशालपेटवून आणि भूमिपूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी आणि आयोजकांसोबत मैदानावर उतरलेल्या धनराज पिल्ले यांचा गोल पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक होता. पिल्ले यांनी गोल केल्यावर खेळाडूंमध्ये उत्साह पसरला.